मुंबई - भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याहस्ते पुण्यातील जी२० परिषदेचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी बोलताना जगभरातील आर्थिक परस्थिती आणि भारताचा जीडीपी यावर राणेंनी भाष्य केलं. आजपासून इन्फ्रास्ट्रक्चर वर्किंग ग्रुपची दोन दिवसीय बैठक सुरु होणार आहे. या बैठकीत सहभागी होणारे देश आणि संस्था पायाभूत सुविधांमधील गुंतवणुकीच्या विविध पैलूंवर विचारमंथन करणार आहेत. या उद्घाटनानंतर बोलताना राणेंनी जगभरातील आर्थिक मंदीवर भाष्य करताना देशातही जून महिन्यानंतर आर्थिक मंदी येण्याची शक्यता वर्तवली आहे.
सध्या जगामध्ये आर्थिक मंदी मोठमोठ्या देशांना आहे. भारतात आर्थिक मंदी येऊ नये, पण आली तर ती जूननंतर अपेक्षित आहे, असे विधान नारायण राणेंनी केले. मात्र, त्या आर्थिक मंदीची झळ भारतीयांना बसू नये, भारतात आर्थिक मंदी येऊ नये, असे प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आहेत, अशी माहितीही राणेंनी दिली. जी २० परिषदेतील राणेंच्या या माहितीमुळे मंदीबाबतची चर्चा सुरू झाली आहे.
पुढे बोलताना राणे म्हणाले की, मी स्वतःला भाग्यशाली समजतो की, जी २० या जागतिक परिषदेचे उदघाटन माझ्या हाताने झाले. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आपण देशाची प्रगती करत आहोत, आपल्या जीडीपीमध्ये कमालीची वाढ होत असून आठ वर्षापूर्वी आपला देश १० व्या क्रमांकावर होता. आपला आता देश ५ व्या क्रमांकावर आहे. ते केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणामुळे शक्य झाले आहे. येत्या १० वर्षांत आपण तिसर्या क्रमांकावर जाऊ, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, १ डिसेंबर २०२२ ते ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंत भारत जी20 परिषदेचं अध्यक्षपद भूषवत आहे.