- नामदेव मोरे, नवी मुंबईगणेश उत्सव मंडळांनी न्यायालयाने बंदी घातल्यानंतरही रस्त्यांवर खड्डे काढून स्वागत कमानी उभ्या केल्या आहेत. स्वागत कमानींमध्ये मंडळाचे अर्थकारण दडले आहे. बिल्डर, ज्वेलर्स व इतर व्यवसायीकांकडून कमानींसाठी २५ हजार ते १ लाख रूपये घेतले जात असून मंडळाच्या फायद्यासाठी शहर विदु्रप केले जात आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिका व पोलिस प्रशासनाने यावर्षी रोडवर गणेश उत्सव मंडळांना परवानगी दिलेली नाही. बहुतांश सर्व मंडळांनी मैदान व इतर मोकळ्या जागेवर उत्सव सुरू केला आहे. पहिल्यांदाच शहरात वाहतूक कोंडी झालेली नाही. परंतु रोडवर मंडप नसला तरी स्वागत कमानींचे अतिक्रमण झाले आहे. उच्च न्यायालयाने रोडवर खड्डे काढून कमानी उभारण्यास मनाई केली आहे. परंतु शहरातील बहुतांश मंडळांनी रोडवरच खड्डे खोदले आहेत. विशेष म्हणजे महापालिकेने प्रत्येक मंडळाला एक किंवा दोन कमानी उभारण्याची परवानगी दिली आहे. त्यावरही व्यवसायिक जाहीरात करण्यास मनाई केली आहे. परंतु महत्वाच्या मंडळांनी १० ते १५ कमानी उभारल्या आहेत. शहरात ५०० पेक्षा जास्त अनधिकृत कमानी उभारण्यात आल्या आहेत. मंडळाच्या अर्थकारणामुळे कमानींची संख्या वाढत आहे. बहुतांश मंडळांचे पदाधिकारी राजकिय पक्षांशी संबंधीत आहेत. यामुळे शहरातील बांधकाम व्यावसायीक, ज्वेलर्स व इतर व्यवसायीकांकडून गणेश उत्सवासाठी २५ हजार ते १ लाख रूपयांपर्यंत वर्गणी घेतली जाते. राजकिय नेत्यांकडूनही वर्गणी घेतली जाते. या बदल्यात कमानी उभारून त्यावर संबंधीत व्यवसायीकाची जाहीरात केली जाते. महापालिकेचा महसुल बुडवून व रोडवर खड्डे खणून बिनधास्त अनधिकृत कमानी उभ्या केल्या जात आहे. गणरायाच्या आगमनाच्यादिवशी कमानीमुळे गणेश मुर्तींनाही अडथळा निर्माण झाला होता. या अतिक्रमणावर महापालिका प्रशासनाने कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहेत. मंडळांना सभामंडपात स्वागत कमान उभी करण्याची परवानगी दिली जावी असेही मत व्यक्त करण्यात आले आहे. महापालिकेनेही अनधिकृत कमानींविरोधात मोहिम हाती घेतली आहे. सर्व विभाग अधिकाऱ्यांना त्यांच्या विभागातील अनधिकृत कमानींना तत्काळ नोटीस पाठवून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.यामुळे आता अनेक मंडळांचे धाबे दणाणले असून कारवाई होणार की नाही याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. कारवाई करण्याच्या मनपाच्या सूचना महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळे यांनी सांगितले की यावर्षी रोडवर गणेश उत्सव मंडळांना परवानगी दिलेली नाही. एक किंवा दोन स्वागत कमानींची परवानगी दिली आहे. परंतू काही ठिकाणी अनधिकृतपणे जास्त कमानी उभारण्यात आल्या असून त्यावर व्यवसायीक जाहीराती लावण्यात आल्याचे निदर्शनास आले असून संबंधीतांवर कारवाई करण्याच्या सुचना विभाग अधिकाऱ्यांना दिल्या असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अनधिकृत होर्डिंगबाजीही सुरूच गणेश उत्सवाच्या नागरिकांना शुभेच्छा देण्यासाठी सर्वच राजकिय पक्षांनी मोठ्याप्रमाणात होर्डींग लावले आहेत. परंतू अनेकांनी यासाठी परवानगीच घेतलेली नाही. महापालिकेचा महसुल बुडवून फुकटची जाहीरातबाजी सुरू आहे. सर्व विनापरवाना होर्डींगवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी नागरिक करू लागले आहेत.
कमानींमध्ये दडलंय अर्थकारण
By admin | Published: September 19, 2015 12:48 AM