Join us

प्रफुल्ल पटेल यांच्यावर ईडीची कारवाई; वरळीतील सीजे हाउसमधील चार मजले जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 5:30 AM

हे प्रकरण ड्रग माफिया इक्बाल मिर्ची याच्याशी निगडित असून, या प्रकरणी ऑक्टोबर २०१९ मध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांनी प्रफुल्ल पटेल यांची १२ तास चौकशी केली होती. 

लोकमत न्यूज नेटवर्क 

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यावर ईडीने (सक्तवसुली संचालनालय) कारवाई करत मुंबईतील वरळी येथील सीजे हाउस या आलिशान इमारतीतील चार मजल्यांवर तात्पुरत्या (प्रोव्हिजनल) जप्तीची कारवाई केली आहे. हे प्रकरण ड्रग माफिया इक्बाल मिर्ची याच्याशी निगडित असून, या प्रकरणी ऑक्टोबर २०१९ मध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांनी प्रफुल्ल पटेल यांची १२ तास चौकशी केली होती. 

उपलब्ध माहितीनुसार, वरळीतील सीजे हाउस या प्रॉपर्टीचा पुनर्विकास प्रफुल्ल पटेल यांच्या कंपनीने केला होता. या प्लॉटवर इक्बाल मिर्ची याचीही काही मालमत्ता होती. पुनर्विकासानंतर उभ्या राहिलेल्या इमारतीत मिर्चीला एकूण १४ हजार चौरस फूट क्षेत्रफळ असलेले दोन मजले देण्यात आले होते. या प्रकरणी जेव्हा २०१९ मध्ये पटेल यांची चौकशी झाली होती, त्यावेळी मिर्ची याची तेथे मालमत्ता असल्याने पुनर्विकासानंतर त्या बदल्यात त्याला दोन मजले दिल्याची माहिती त्यांनी दिली होती. 

तीन वर्षांपूर्वी डीएचएफएल प्रकरणात कंपनीचे मालक वाधवान बंधूंना ईडीने अटक केली होती. त्यावेळी त्यांचा संबंध इक्बाल मिर्ची याच्याशी आल्याचे तपास अधिकाऱ्यांना समजले होते. त्यानंतर ईडीने मिर्ची याच्या विविध मालमत्ता जप्त केल्या होत्या. 

ईडी कार्यालय सीजे हाउसमध्येच!

मुंबईत ईडीची दोन कार्यालये आहेत. यापैकी झोन-१ चे कार्यालय हे बॅलॉर्ड इस्टेट परिसरातील कैसर-ए-हिंद इमारतीमध्ये आहे तर झोन-२ चे ऑफिस हे सीजे हाउस इमारतीत आहे.

टॅग्स :प्रफुल्ल पटेलराष्ट्रवादी काँग्रेसअंमलबजावणी संचालनालय