Join us

पक्ष बदलल्याने ‘ईडी’ची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 4:06 AM

पक्ष बदलल्याने ईडीची कारवाईएकनाथ खडसे यांची उच्च न्यायालयाला माहितीपक्ष बदलल्याने ‘ईडी’ची कारवाईभोसरी भूखंड गैरव्यवहार प्रकरण; एकनाथ ...

पक्ष बदलल्याने ईडीची कारवाई

एकनाथ खडसे यांची उच्च न्यायालयाला माहिती

पक्ष बदलल्याने ‘ईडी’ची कारवाई

भोसरी भूखंड गैरव्यवहार प्रकरण; एकनाथ खडसे यांची उच्च न्यायालयाला माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : आपण राजकीय पक्ष बदलल्यानंतर ‘ईडी’ने भोसरी भूखंड प्रकरणाची चौकशी मागे लावली, अशी माहिती एकनाथ खडसे यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयाला मंगळवारी दिली.

भोसरी भूखंड प्रकरणी २०१६ मध्ये तक्रार नोंदविण्यात आली आणि २०१८ मध्ये पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट दाखल केला. त्यावेळी ईडी कुठेही नव्हती. पक्ष बदलल्यावर ईडीने अचानक या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली. त्यामुळे आपल्याला ईडीच्या समन्सपासून संरक्षण मिळावे, असा युक्तिवाद खडसे यांच्या वतीने ज्येष्ठ वकील आबाद पोंडा यांनी न्या. एस. एस. शिंदे व न्या. मनीष पितळे यांच्या खंडपीठापुढे केला.

प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉंड्रिंग ॲक्टअंतर्गत एखादी व्यक्ती तपासाला सहकार्य करीत नसेल तर त्याला थेट अटक करण्याची तरतूद आहे. त्यामुळे खडसे यांना अटकेपासून संरक्षण मिळविण्यासाठी उच्च न्यायालयाशिवाय पर्याय नाही. खडसे यांच्याविरोधात आर्थिक गुन्ह्यासंदर्भात केस करण्यात आली आहे. त्यात जामिनावर सुटका करण्याची तरतूद नाही. तसेच खडसे यांना अनेक आजार असल्याने त्यांना नियमित रुग्णालयात दाखल व्हावे लागते, असा युक्तिवाद पोंडा यांनी केला.

खडसे यांनी ऑक्टोबर २०२० मध्ये भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यावर ईडीने कारवाई सुरू केली. खडसे यांना डिसेंबर २०२० मध्ये ईडीने समन्स बजावले. खडसे यांनी राजकीय पक्ष बदलल्यावर जून २०२० मध्ये ईडीने गुन्हा नोंदविला. वास्तविक तक्रार २०१६ मध्ये करण्यात आली आणि समन्स डिसेंबरमध्ये बजावले, असा युक्तिवाद पोंडा यांनी केला. उच्च न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी तहकूब केली.

....................