मुंबई : येस बँक घोटाळ्याप्रकरणी पुण्याचे विकासक अविनाश भोसले यांचा ताबा घेण्याची परवानगी ईडीला सोमवारी विशेष न्यायालयाने दिली. अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर लि.(एबीआयएल)चे प्रमोटर भोसले यांना सीबीआयने २६ मे रोजी अटक केली. त्यानंतर आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी भोसले यांचा ताबा मिळावा, यासाठी ईडीने विशेष न्यायालयात अर्ज केला. विशेष सीबीआय न्यायालयाचे सोमवारी न्या. एस. यू. वडगावकर यांनी आर्थर रोड कारागृहाच्या पोलीस अधीक्षकांना भोसले यांचा ताबा ईडीला देण्याचे निर्देश दिले.सीबीआयच्या म्हणण्यानुसार, एप्रिल व जून २०१८ मध्ये येस बँकेने ३,९८३ कोटी रुपये अल्पकाळासाठी डीएचएफएलमध्ये गुंतविले. त्यानंतर येस बँकेने डीएचएफलचे ७५० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले. त्याचा मोबदला म्हणून डीएचएफएल बँकेने राणा यांच्या कुटुंबीयांच्या फर्मला ६०० कोटी रुपयांचे कर्ज दिले. २०१७-२०१८ मध्ये डीएचएफएलने ६८.८२ कोटी रुपये भोसलेंच्या कंपनीला कन्सल्टन्सी फी म्हणून दिले. मात्र, भोसलेंच्या कंपनीने प्रत्यक्षात कोणतीही सेवा दिली नव्हती. याबाबतच आता ईडीला भोसले यांची चौकशी करायची आहे.
अविनाश भोसलेंचा ताबा घेण्यास ईडीला परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 1:51 PM