क्राइम ब्रँचकडून माहिती मागविली
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बहुचर्चित अश्लील चित्रपट रॅकेटच्या तपासात आता सक्तवसुली संचालनालय (ईडी) सक्रिय झाली आहे. याप्रकरणात मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार आणि परदेशात रक्कम वळविण्यात आल्याचे स्पष्ट होत असल्याने त्याचा छडा लावण्याचे ईडीने ठरविले आहे. त्यासाठी मुंबई गुन्हा अन्वेषण शाखेकडे ‘एफआयआर’ व प्राथमिक तपासाचा अहवाल मागविला आहे. त्यानंतर येत्या काही दिवसांत प्रत्यक्ष तपास सुरू केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
पॉर्न फिल्म रॅकेट प्रकरणात राज कुंद्रा यांना मुंबई पोलीस गुन्हे शाखेने अटक केल्यानंतर आता ईडीने दखल मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाची एफआयआर आणि प्राथमिक तपासाचा अहवाल त्वरित पाठविण्याची सूचना केली आहे, त्यानंतर मनी लॉण्ड्रिंग अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात येणार आहे.
ईडीतील सूत्रांचे म्हणणे आहे की, राज कुंद्रा यांना फेमाअंतर्गत नोटीस समन्स बजावले जाणार आहे. या प्रकरणात, कंपनीच्या संचालकांची तसेच राजची पत्नी व अभिनेत्री शिल्पा शेट्टीची चौकशी होणार असल्याची शक्यता आहे.
कुंद्राकडून भारत आणि ब्रिटनमधील पैशांच्या व्यवहाराचीही चर्चा आहे. येस बँक खाते आणि राज कुंद्रा आणि त्यांची कंपनी यांच्या यूबीए खात्यामधील व्यवहारांची चौकशी करण्यात येत आहे. राजसह आतापर्यंत अटक सर्व आरोपी, शिल्पा शेट्टीसह सर्व संशयित, कुंद्राच्या कंपनीशी करार केलेले मॉडेल्स आदीसह संबंधितांच्या सर्व आर्थिक बाबींची सखोल छाननी केली जाणार आहे.