मुंबई - पंजाब नॅशनल बँकेत 11,500 कोटी रुपयांच्या महाघोटाळ्याचा प्रमुख सूत्रधार हिरे व्यावसायिक नीरव मोदीशी संबंधित ठिकाणांवर शनिवारी (24 मार्च) ईडी आणि सीबीआयनं संयुक्तरित्या छापेमारीची कारवाई केली. मुंबईतील 'समुद्र महाल' या इमारतीतील नीरव मोदीच्या निवासस्थानावर टाकण्यात आलेल्या छाप्यामध्ये महागड्या वस्तू आणि दागिन्यांचा समावेश आहे. छाप्यादरम्यान, 10 कोटी रुपयांची एक अंगठी आणि 1.40 कोटी रुपयांचं घड्याळ जप्त केले आहे. याव्यतिरिक्त 10 कोटी रुपयांचे पेटिंग्सदेखील ताब्यात घेण्यात आल्या आहेत.
नीरव मोदीची फायरस्टार डायमंड ही कंपनी आहे. त्याला 'नीरव मोदी डायमंड ब्रँड' या नावाने भारतासह जगभरात ज्वेलरी शोरुम सुरु केली आहेत. दिल्ली, मुंबईपासून ते लंडन, हाँगकाँग आणि न्यूयॉर्कपर्यंत नीरव मोदींची 25 लग्झरी स्टोअर्स आहेत. नीरव मोदी यांच्या ज्वेलरीची किंमत 10 लाखांपासून 50 कोटी रुपयांपर्यंत आहे.
47 वर्षीय नीरवचे वडील देखील हिरेव्यापारीच होते. नीरव वॉर्टन महाविद्यालयात शिकत असतानाच वडिलांचा व्यवसाय थंडावला. त्यामुळे त्याला शिक्षण अर्धवट सोडून बेल्जियममध्ये परतावे लागले. यानंतर नीरव मोदी भारतात आला. नीरवला भारतातील 'डायमंड किंग' असंही संबोधलं जातं. नीरव मोदी फोर्ब्ज या जगभरातील श्रीमंतांच्या यादीत 84 व्या स्थानावर आहे. फोर्ब्जच्या आकडेवारीनुसार नीरव मोदी यांची जवळपास 12 हजार कोटींची संपत्ती आहे.