ईडीकडून माजी आमदार विवेक पाटील यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:08 AM2021-06-16T04:08:23+5:302021-06-16T04:08:23+5:30
कर्नाळा बँक कोट्यवधी घोटाळा प्रकरण लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई / पनवेल : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बहुचर्चित कर्नाळा बँकेच्या शेकडो ...
कर्नाळा बँक कोट्यवधी घोटाळा प्रकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई / पनवेल : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बहुचर्चित कर्नाळा बँकेच्या शेकडो कोटीच्या घोटाळ्याप्रकरणी मंगळवारी शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना अटक केली. रात्री त्यांच्या निवासस्थानी छापा टाकून ही कारवाई करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
कर्नाळा बँककडून बनावट कर्ज प्रकरणे व गैरव्यवहारातून गेल्या काही वर्षात २९ कोटीचा घोटाळा झाल्याचे तपासातून उघड झाले आहे. याप्रकरणी गुंतवणूकदारांनी दोषीवर कारवाई व्हावी, यासाठी दीर्घकाळ आंदोलन केले होते. अपहाराची व्याप्ती मोठी असल्याने सहकार खाते, स्थानिक तपास यंत्रणेसह ईडीकडे तक्रार करण्यात आली. पनवेलचे भाजपा आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्याबाबत पुढाकार घेतला होता. त्यांनतर प्रमुख सांशयित ,शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांच्यासह बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळावर ईडीकडून मनी लौंड्रिंग कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. पाटील हे गेल्या काही महिन्यापासून तपास यंत्रणेच्या रडारवर होते. त्यांची वाहने व मालमत्तेवर ईडीने यापूर्वी टाच आणली असून गुंतवणूक असलेली विविध बँक खाती सिल केली आहेत. न्यायालयाकडून अटक टाळण्यापासून संरक्षण न दिल्याने त्यांना कोणत्याही क्षणी कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मुंबई ईडी झोन-२ चे सहायक संचालक सुनील कुमार यांनी मंगळवारी रात्री त्यांना रायगड येथील निवासस्थानातून ताब्यात घेतले. बुधवारी त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.
५० हजारांपेक्षा जास्त ठेवीदार
पनवेल येथील कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या ५२९ कोटीच्या घोटाळ्याला विवेक पाटील यांच्यासह त्यांचे संचालक मंडळाला जबाबदार धरण्यात आले आहे. ५० हजारांपेक्षा जास्त ठेवीदारांच्या कर्नाळा बँकेत ठेवी आहेत. यामध्ये पनवेल ,उरण मधील स्थानिकांच्या ठेवी मोठ्या प्रमाणात आहेत. महाविकास आघाडी सरकार विवेक पाटील यांना कारवाईपासून वाचवत असल्याचा आरोप करण्यात येत होता. आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह आमदार महेश बालदी हे विवेक पाटील यांच्यावर कारवाईसाठी प्रयत्नशील होते. दोन्ही आमदारांनी ठेवीदारांना घेऊन मोर्चे देखील काढले होते.