मनी लाँड्रिंगप्रकरणी ठाण्यातील व्यावसायिक योगेश देशमुखला ईडी कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2021 04:47 AM2021-04-08T04:47:54+5:302021-04-08T04:48:15+5:30
ईडीने योगेश देशमुख यांच्या घरी १७ मार्च रोजी छापा टाकला होता. त्यावेळी त्यांच्या पत्नीने ईडीच्या अधिकाऱ्यांसोबत हुज्जत घातली होती.
मुंबई : हजारो कोटींच्या एनएसईएल घोटाळ्याप्रकरणी सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) आणखी एक कारवाई करताना ठाण्यातील व्यावसायिक योगेश देशमुख यांना मंगळवारी रात्री उशिरा अटक केली. मनी लाँड्रिंगअंतर्गत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले असून, बुधवारी त्यांना ईडी कोठडी मिळाली.
देशमुख हे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या निकवर्तीय समजले जातात. ही कारवाई त्यांच्यासाठी धक्कादायक मानली जात आहे. ईडीने योगेश देशमुख यांच्या घरी १७ मार्च रोजी छापा टाकला होता. त्यावेळी त्यांच्या पत्नीने ईडीच्या अधिकाऱ्यांसोबत हुज्जत घातली होती. देशमुख यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती सुधारल्यानंतर त्यांना मंगळवारी चौकशीसाठी ताब्यात घेतले. सुमारे ६ तास चौकशी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.
दरम्यान, ईडीने गेल्या वर्षी २४ नोव्हेंबर रोजी प्रताप सरनाईक आणि त्यांचे सुपुत्र विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर छापे टाकले होते. त्यानंतर विहंग यांची ईडीने पाच तास चौकशी केली होती. ईडीने सरनाईक यांच्या घर, कार्यालय आणि हॉटेलसह १० ठिकाणांवर छापे टाकले होते. त्यावेळी सरनाईक मुंबईत नव्हते. ते परदेशात होते.