Join us

एकनाथ खडसे यांच्या जावयाला ईडीकडून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2021 4:05 AM

भोसरी भूखंड खरेदी गैरव्यवहार प्रकरण : १२ जुलैपर्यंत कोठडीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) माजी ...

भोसरी भूखंड खरेदी गैरव्यवहार प्रकरण : १२ जुलैपर्यंत कोठडी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) माजी महसूलमंत्री व राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी याला अटक केली आहे. पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणात त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. मंगळवारी सुमारे १३ तास चौकशी केल्यानंतर त्याला अटक केली असून, १२ जुलैपर्यंत कोठडी देण्यात आली आहे.

या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, खडसे यांची पत्नी मंदाकिनी खडसे यांना लवकरच चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजाविण्यात येईल, असे सांगण्यात आले. खडसे यांनी भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणेकडून त्यांच्या व कुटुंबीयांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे. यापूर्वी जानेवारीमध्ये एकनाथ खडसे यांची चौकशी करण्यात आली होती. मंगळवारी सकाळी अकरा वाजता अनिवासी भारतीय (एनआरए) असलेला त्यांचा जावई गिरीश चौधरी चौकशीसाठी ईडीच्या बेलार्ड पियार्ड येथील कार्यालयात हजर झाला. दोन टप्प्यात रात्री बारा वाजेपर्यंत त्याच्याकडे भोसरीतील जमीन खरेदी प्रकरणी कसून विचारणा करण्यात आली. मात्र, तो समाधानकारक उत्तरे देऊ शकला नाही. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली. बुधवारी दुपारी त्याला ईडीच्या न्यायालयात हजर करण्यात आले. भूखंड खरेदीमध्ये गैरव्यवहार असल्याने सखोल चौकशी आवश्यक असल्याने १२ जुलैपर्यंत कोठडी सुनावण्यात आली.

काय आहे भोसरी जमीन घोटाळा

फडणवीस सरकारमध्ये एकनाथ खडसे हे महसूलमंत्री असताना पुण्यातील भोसरी एमआयडीसी येथे ३.१ एकर भूखंड खडसे यांची पत्नी व जावयाच्या नावे खरेदी करण्यात आला होता. त्यासाठी त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप २०१६मध्ये झाला होता. मूळ ३१ कोटी किंमत असलेल्या या भूखंडाची निव्वळ ३.७ कोटी रुपयांना विक्री झाल्याचा दावा केला गेला होता. रेडिरेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून जमिनीची खरेदी झाल्याचा आरोप आहे.

हा भूखंड अब्बास उकानी यांच्या मालकीचा होता. त्यांच्याकडून एमआयडीसीने १९७१मध्ये अधिग्रहण केला होता, परंतु उकानी यांना नुकसानभरपाई देण्याचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे. खडसे यांनी १२ एप्रिल २०१६ रोजी बैठक बोलावली आणि अधिकाऱ्यांना जमीन उकानींना परत द्यावी की त्यांना जास्त नुकसानभरपाई द्यावी, याविषयी त्वरित निर्णय घेण्याचे निर्देश दिल्याचा दावा केला जातो. पंधरवड्यातच उकानी यांनी खडसे यांच्या नातलगांना (पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी) भूखंड विक्री केल्याचे समोर आले होते.

खडसेंची भूमिका

‘एमआयडीसीच्या जमिनीशी माझा दुरान्वयेही संबंध नाही, एक इंचही जमीन मी घेतली नाही. माझा व्यवहार झालेला नाही. उताऱ्यावर मूळ मालकाचे नाव आहे, एमआयडीसीचे नाव नंतर आहे. मुळात मी महसूलमंत्री होतो, म्हणून पदाचा गैरवापर करण्याचा काय संबंध?’ असे खडसे काही महिन्यांपूर्वी म्हणाले होते.