ईडीकडून नेत्यांवरील आरोपांची छाननी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 04:07 AM2019-09-26T04:07:22+5:302019-09-26T04:07:34+5:30
राज्य सहकारी बँक कथित कर्जघोटाळा
मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बॅँकेतील २५ हजार कोटींच्या कथित घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह ७० नेत्यांवर आर्थिक गैरव्यवहार (मनी लाँड्रिंग) केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून खळबळ उडवून दिलेल्या सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) त्याबाबत सावधगिरीने पावले उचलली आहेत. गुन्हा दाखल असलेल्या सर्व नेत्यांवरील आरोपांची ते सूक्ष्मपणे छाननी करत आहेत. त्यानंतर आवश्यकतेनुसार संबंधितांवर नोटीस बजावून त्यांना चौकशीस बोलावू, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
उच्च न्यायालयाच्या आदेशपत्रात शरद पवार यांचे नाव नसले तरी घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार (किंगपिन) म्हणून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे राष्टÑवादी व त्यांच्या मित्र पक्षांकडून राज्यभरात निषेधाचा सूर आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी दाखल गुन्हे व न्यायालयाच्या आदेशाची सूक्ष्म छाननी सुरू केली. या प्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपमध्ये प्रवेश केलेले विजयसिंह मोहिते-पाटील, आनंदराव अडसुळ, रामप्रसाद बोर्डिकर यांच्यासह ६६ आजी-माजी संचालकांवर गुन्हे दाखल आहेत. पैकी काही संचालकांचे निधन झाले आहे.