ईडी, सीबीआयचा राजकीय विरोधकांविरुद्ध गैरवापर - नवाब मलिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:08 AM2021-08-29T04:08:54+5:302021-08-29T04:08:54+5:30
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या मनात ईडी व सीबीआयच्या कारवाईबाबत शंका निर्माण होत असेल तर याचा अर्थ राजकीय द्वेषातून सूडभावनेने ...
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या मनात ईडी व सीबीआयच्या कारवाईबाबत शंका निर्माण होत असेल तर याचा अर्थ राजकीय द्वेषातून सूडभावनेने कारवाई होत होती हे सत्य असून ते लोकांनाही कळले आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते व अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी शनिवारी केली. ईडी आणि सीबीआय यांचा तपास आणि कारवाईवर सुप्रीम कोर्टाने शंका उपस्थित केली. याबाबत त्यांनी हे मत व्यक्त केले.
ईडी व सीबीआयला सुप्रीम कोर्टाने प्रतिज्ञापत्र सादर करायला सांगितले होते. मात्र त्यांनी याद्या देऊन त्यांचे काम पूर्ण झाले, अशी भूमिका स्वीकारली. याबाबतीत ईडी व सीबीआयकडे किती राजकीय आणि इतर केसेस प्रलंबित आहेत, याची माहिती सुप्रीम कोर्टाने घेतली आहे, अशी माहिती मलिक यांनी दिली.
ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची संपत्ती जप्त करण्यात आली. तर काही राजकीय नेत्यांना वारंवार बोलावून त्रास दिला जातोय, अशा प्रकारे राजकीय दबावाने काम सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.