Join us

ईडीकडून उपायुक्त भुजबळ, एसीपी पाटील यांच्या घरांची झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 4:06 AM

परमबीर सिंह यांच्याकडील चौकशी मात्र प्रलंबित : अनिल देशमुख १०० कोटी वसुली प्रकरणजमीर काझीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई ...

परमबीर सिंह यांच्याकडील चौकशी मात्र प्रलंबित : अनिल देशमुख १०० कोटी वसुली प्रकरण

जमीर काझी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : वादग्रस्त आयपीएस अधिकारी व मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या दर महिन्याला १०० कोटी वसुलीच्या कथित आरोपाप्रकरणी सक्तवसुली संचालनालय (ईडी) आर्थिक व्यवहाराची पाळेमुळे खोदून काढत आहे. या प्रकरणात साक्षीदार असलेल्या पोलीस उपायुक्त राजू भुजबळ व सहाय्यक आयुक्त संजय पाटील यांच्या मूळगावातील घरांची झडती घेतली आहे. त्यांची स्थावर व जंगम मालमत्तेची पडताळणी करण्यात येत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

भुजबळ यांच्या अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर व पाटील यांच्या पुण्यातील शिर्कापूर ( ता. शिरूर) येथील घराची मंगळवारी तपासणी करण्यात आली. त्यांच्या नातेवाइकांच्या नावे असलेल्या मालमत्तेबद्दलचा तपशील जाणून घेण्यात आला. दोन स्वतंत्र पथकांमार्फत ही कारवाई करण्यात आली आहे.

मुख्य साक्षीदार परमबीर सिंह यांचा मात्र अद्याप सविस्तर जबाब नोंदविण्यात आलेला नाही. आजारी असल्याने ते चंदीगड येथे उपचार घेत असल्याचे कळविले आहे. त्यांच्या उपलब्धतेसाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा केली जाणार आहे, त्यानंतर त्यांना समन्स बजाविले जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

ईडीने या प्रकरणात महिन्याभरापूर्वी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पलांडे व सहाय्यक कुंदन शिंदे यांना अटक केली असून, सध्या दोघे न्यायालयीन कोठडीत आहेत. त्याशिवाय देशमुख यांच्या नागपूर व मुंबईतील घरांवर छापे टाकून आतापर्यंत वरळीतील फ्लॅट व नवी मुंबईतील भूखंड असा एकूण ४.२० कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. एनआयएच्या अटकेतील बडतर्फ एपीआय सचिन वाझे याला दर महिन्याला १०० कोटींची वसुली करण्याचे टार्गेट देण्यात आले होते, त्यानुसार त्याने डिसेंबर ते फेब्रुवारी या काळात ४.७० कोटींची बारमालकांकडून वसुली करून पलांडे व शिंदे यांना दिल्याचा जबाब दिला आहे. ही रक्कम हवालामार्फत देशमुख यांच्या संस्थेच्या नावे जमा करण्यात आल्याचा दावा ईडीने केला आहे.

भुजबळ, पाटील यांच्याकडून आरोपांचे खंडण

परमबीर सिंह यांनी आरोपादाखल उपायुक्त भुजबळ व सहाय्यक आयुक्त पाटील यांच्या व्हाॅट्सॲप चॅटचे दाखले दिले होते. मात्र चौकशीत दोघँनी ते आरोप फेटाळले असून, चुकीच्या संदर्भात ते सादर करण्यात आल्याचा जबाब ईडीला दिला असल्याचे समजते.