लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : देशविघातक कारवाया केल्याप्रकरणी कारवाई सुरू असलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेची २ कोटी ५३ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता ईडीने शनिवारी जप्त केली. केरळमधील मुन्नार येथे या संस्थेने बेहिशेबी पैशांतून चार आलिशान बंगले बांधले होते, तसेच सहा एकर जागाही खरेदी केली होती. या स्थावर मालमत्ता ईडीने जप्त केल्या आहेत.
पीएफआय या संस्थेच्या कारवाया उघडकीस आल्यानंतर काही महिन्यांपूर्वी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) देशव्यापी छापेमारी करत संस्थेच्या अनेक सक्रिय सदस्यांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीदरम्यान संस्थेच्या आर्थिक व्यवहारांची माहिती तपास अधिकाऱ्यांना प्राप्त झाली होती. त्यानंतर ईडीनेही संस्थेच्या आर्थिक व्यवहारांचा, पैशांच्या स्रोताचा तपास सुरू केला होता. तसेच संस्थेच्या विरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता.
संस्थेचे भारतातील व परदेशातील काही सदस्य केरळमध्ये जमीन विकत घेऊन बंगले बांधत असल्याची माहिती तपासादरम्यान ईडीला प्राप्त झाली. या बांधकामाचे सर्व व्यवहार हे मुन्नार व्हिला विस्ता प्रोजेक्टस या मुन्नारस्थित कंपनीतून होत होते. या कंपनीमध्ये देशातून तसेच परदेशातून जो पैसा गुंतवला गेला होता त्यातील बरीचशी रक्कम ही रोखीने गुंतवली गेली होती.
कंपनीमध्ये गुंतलेल्या २१ कोटी ९० लाख रुपयांचा स्रोत कंपनीला नमूद करता आला नाही. तसेच, कंपनीने काही समभागधारकांना जी शेअर सर्टिफिकेट जारी केली होती तीही बोगस नावांवर असल्याचे तपासात आढळून आले. त्यानंतर ईडीने ही जप्तीची कारवाई केली आहे.