ED: ‘ईडी’ची नजर क्रिप्टो करन्सीवर, पाच कंपन्यांवर छापे, एक हजार कोटींचे मनी लाँड्रिंग झाल्याचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 07:20 AM2022-08-30T07:20:39+5:302022-08-30T07:21:08+5:30
ED Raids : गेल्या काही वर्षांत लोकांना भुरळ घातलेली क्रिप्टो करन्सी आता ‘ईडी’च्या रडारवर आली आहे. क्रिप्टो करन्सी सेवा देणाऱ्या कंपन्या मनी लाँड्रिंगमध्ये गुंतल्याच्या संशयावरून ‘ईडी’ने आता या कंपन्यांच्या दिशेने कारवाईची चक्रे फिरवण्यास सुरुवात केली आहे.
मुंबई : गेल्या काही वर्षांत लोकांना भुरळ घातलेली क्रिप्टो करन्सी आता ‘ईडी’च्या रडारवर आली आहे. क्रिप्टो करन्सी सेवा देणाऱ्या कंपन्या मनी लाँड्रिंगमध्ये गुंतल्याच्या संशयावरून ‘ईडी’ने आता या कंपन्यांच्या दिशेने कारवाईची चक्रे फिरवण्यास सुरुवात केली आहे. गेल्या २५ दिवसांत ‘ईडी’ने देशात क्रिप्टो सेवा देणाऱ्या तीन महाकाय कंपन्यांवर छापेमारी केली असून सुमारे ४०० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. या कंपन्यांच्या माध्यमातून तब्बल १ हजार कोटी रुपयांचे मनी लाँड्रिंग झाल्याचा ईडी’ला संशय असून त्यादृष्टीने आता ईडीचे अधिकारी तपास करत आहेत.
देशातील सर्वांत लोकप्रिय असलेल्या वझीरेक्स या कंपनीने मनी लाँड्रिंग केल्याच्या संशयावरून ‘ईडी’ने ५ ऑगस्ट रोजी कंपनीच्या एका संचालकावर छापेमारी केली. त्याच्या कंपनीची ६४ कोटी ६७ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली. या चौकशीदरम्यान मोबाइल ॲपद्वारे कर्ज देणाऱ्या कंपन्या आणि क्रिप्टो करन्सी सेवा देणाऱ्या कंपन्यांमध्ये साटेलोटे असल्याचे ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांना आढळले. यानंतर, ईडीने गेल्या २५ दिवसांत वझीरेक्स, फ्लिपव्होल्ट, कॉईनस्वीच कुबेर या तीन मोठ्या कंपन्यांसह आणखी दोन कंपन्यांवर छापेमारी केल्याची माहिती आहे.
वझीरेक्सवरील कारवाईनंतर...
वझीरेक्स कंपनीवर केलेल्या कारवाईनंतर मोबाइल ॲपद्वारे कर्ज देणाऱ्या कंपन्या आणि क्रिप्टो यांचा संबंध ईडीच्या अधिकाऱ्यांना दिसून आला.
मुळात मोबाइल ॲपद्वारे कर्ज देणाऱ्या ज्या कंपन्या भारतात कार्यरत आहेत, त्यापैकी बहुतांश कंपन्यांचे मालक चिनी असल्याचे ‘ईडी’च्या तपासात दिसून आले.
‘ईडी’ने अशा सुमारे ६०० कंपन्यांना यापूर्वीच नोटिसा जारी करत त्यांची चौकशी सुरू केली आहे.
मोबाइल ॲप कंपन्यांनी कर्जाचे वितरण केल्यानंतर, त्याच्या वसुलीतून जो नफा कमावला तो चीन येथील मूळ मालकांपर्यंत पोहोचविण्यासाठी क्रिप्टो करन्सीचा वापर केल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांना दिसून आले. त्यामुळेच आता या कंपन्या ईडीच्या रडारवर आल्या आहेत.