ईडीने विजय मल्ल्यावर दाखल केले दोषारोपपत्र
By admin | Published: June 15, 2017 01:33 AM2017-06-15T01:33:51+5:302017-06-15T01:33:51+5:30
आयडीबीआय बँकेचे ९०० कोटी रुपये बुडविल्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी मद्यसम्राट विजय मल्ल्या व अन्य आठ जणांवर पीएमएमए (प्रिव्हेन्शन आॅफ मनी लाँड्रिंग अॅक्ट)
- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आयडीबीआय बँकेचे ९०० कोटी रुपये बुडविल्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी मद्यसम्राट विजय मल्ल्या व अन्य आठ जणांवर पीएमएमए (प्रिव्हेन्शन आॅफ मनी लाँड्रिंग अॅक्ट) अंतर्गत दोषारोपपत्र दाखल केले. हे दोषारोपपत्र सत्र न्यायालयाच्या निबंधकांकडे सादर केले असून, त्याची छाननी झाल्यानंतर विशेष पीएमएलए न्यायालयापुढे सादर करण्यात येईल.
विजय मल्ल्यासह आठ जणांवर ५५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यात त्याच्याविरुद्ध असलेल्या साक्षी-पुराव्यांचा समावेश आहे.
विजय मल्ल्यासह किंगफिशर एअरलाइन्स, युनायटेड ब्रिवेरिज लि, एअरलाइन्स आणि आयडीबीआयचे काही वरिष्ठ कर्मचारी व निवृत्त कार्यकारी संचालकांना सहआरोपी करण्यात आले आहे. ईडीने दोषारोपपत्रात विजय मल्ल्याचा उल्लेख ‘कटाचा मुख्य सूत्रधार’ असा केला आहे.
बँकेकडून कशा प्रकारे कर्ज घेण्यात आले आणि घेतलेले कर्ज कशा प्रकारे परदेशात आयोजित करण्यात आलेल्या ‘फॉर्म्युला -१’ कार रेससाठी वळविण्यात आले, तसेच त्याने हे पैसे कशा प्रकारे त्याच्या वैयक्तिक कामासाठी वापरले, याबाबत संपूर्ण माहिती ईडीने दोषारोपपत्रात नमूद केली आहे. त्याशिवाय किंगफिशरच्या व आयडीबीआयच्या वरिष्ठांनी फ्लो चार्ट आणि डायग्रामच्या मदतीने कशा प्रकारे घोटाळा केला, याचीही माहिती ईडीने दोषारोपपत्रात दिली आहे.
कंपनी आर्थिक तोट्यात असताना तसेच कॉर्पोरेट क्रेडिट रेटिंगचे पालन न करता, खालच्या दर्जाचे क्रेडिट रेटिंग असतानाही मल्ल्याने किंगफिशर एअरलाइन्स व आयडीबीआयच्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांच्या मदतीने कट रचल्याचे ईडीने दोषारोपपत्रात म्हटले आहे.
मल्ल्या २०१६पासून लंडनमध्ये आहे. त्याच्याविरुद्ध प्रत्यार्पण वॉरंट काढण्यात आल्याने स्कॉटलँड पोलिसांनी त्याला १८ एप्रिलला अटक केली. सीबीआयही या प्रकरणाचा तपास करत आहे. विशेष पीएमएलए न्यायालय लवकरच या आरोपपत्राची दखल घेईल.
तपास यंत्रणांना मारला टोमणा
भारतातील अनेक बँकाँचे सुमारे ९ हजार कोटी रुपये बुडविल्याप्रकरणी मल्ल्याला मंगळवारी लंडनच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. मल्ल्याविरुद्ध सबळ पुरावे असल्याचा दावा तपास यंत्रणांनी लंडन न्यायालयात केला. त्यवर मल्ल्याने त्यांना टोमणा मारत म्हटले की, तुम्ही (तपास यंत्रणा) अब्जावधी पौंड मिळण्याची केवळ स्वप्न पाहा.