संजय राऊतांवर ED ने दाखल केलं दोषारोपपत्र; गैरव्यवहारात नाव येऊ नये, यासाठी...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2022 06:08 AM2022-09-17T06:08:50+5:302022-09-17T06:09:41+5:30
पत्राचाळ पुनर्विकास गैरव्यवहार प्रकरणी संजय राऊत यांची जामिनावर सुटका केल्यास ते साक्षीदारांना धमकावतील व पुराव्यांशी छेडछाड करतील, असे म्हणत ईडीने राऊत यांच्या जामीन अर्जाला विरोध केला.
मुंबई : पत्राचाळ पुनर्विकास आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर ईडीने गुरुवारी पुरवणी दोषारोपपत्र दाखल केले आहे. पत्राचाळ गैरव्यवहारात संजय राऊत यांनी मोठी भूमिका बजावल्याचे म्हणत ईडीने शुक्रवारी राऊत यांच्या जामीन अर्जावर आक्षेप घेतला. गैरव्यवहारात आपले नाव पुढे येऊ नये, यासाठी राऊत पडद्यामागून सूत्रे हलवित होते, असे ईडीने जामीन अर्जाला दिलेल्या उत्तरात म्हटले आहे.
पत्राचाळ पुनर्विकासाप्रकरणी ईडीने संजय राऊत यांच्या घराची झडती घेतल्यानंतर १ ऑगस्टला त्यांना अटक केली. राऊत यांनी जामीन अर्जात केलेल्या आरोपांत तथ्य नाही. त्यांनी केलेले आरोप निराधार आहेत. आर्थिक गैरव्यवहारात त्यांचा पूर्णपणे सहभाग आहे, असे ईडीने उत्तरात नमूद केले आहे. संजय राऊत यांनी त्यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांच्याद्वारे गुन्ह्यात मोठी भूमिका बजावली आहे. सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या प्रवीण राऊत यांच्याविरोधात तपास यंत्रणेने दोषारोपपत्र दाखल केले आहे. प्रवीण राऊत यांनी मे महिन्यात जामीन अर्ज दाखल केलेला आहे आणि त्यावरील सुनावणी प्रलंबित आहे. राऊत यांच्यावर राजकीय आकसापोटी किंवा सुडबुद्धीने गुन्हा दाखल करण्यात आला नाही, असे म्हणत ईडीने संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांचे खंडन केले आहे. पत्राचाळीचा पुनर्विकास करण्यासाठी म्हाडाने एचडीआयएलची उपकंपनी गुरुआशिष कन्स्ट्रक्शन प्रा. लि.ला कंत्राट दिले हाेते.
जामिनास विरोध
राऊत यांनी आपण ५५ लाख रुपये कर्ज म्हणून घेतल्याचा दावा केला आहे. मात्र, ईडीने हा दावा फेटाळला आहे. ईडीने तपासाला सुरुवात केल्यानंतर ५५ लाख रुपयांचे कर्ज फेडण्यात आले. संजय राऊत यांची जामिनावर सुटका केल्यास ते साक्षीदारांना धमकावतील व पुराव्यांशी छेडछाड करतील, असे म्हणत ईडीने राऊत यांच्या जामीन अर्जाला विरोध केला.