मुंबई : आयसीआयसीआय बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) चंदा कोचर यांच्यासह त्यांचे व्यावसायिक पती आणि अन्य आरोपींवर मंगळवारी ईडीने विशेष न्यायालयात मसुदा आरोपपत्र दाखल केले.
विशेष पीएमएलए न्यायालय ६ सप्टेंबर रोजी आरोपींवर आरोप निश्चित करणार आहे. चंदा कोचर यांच्यासह दीपक कोचर आणि व्हिडीओकॉन ग्रुपचे प्रमोटर वेणुगोपाल धूत हेही आरोपी आहेत.
दीपक कोचर हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांना गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात अटक करण्यात आली.
चंदा कोचर यांना फेब्रुवारीमध्ये तर वेणुगोपाल धूत यांना मार्च महिन्यात विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला. या दोघांनाही कधीच अटक करण्यात आली नाही.
सीबीआयने कोचर व धूत यांच्यावर गुन्हा नोंदवल्यावर ईडीनेही या सर्वांवर गुन्हा नोंदविला आणि सप्टेंबर २०२० मध्ये दीपक कोचर यांना अटक केली.
आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ असताना कोचर यांनी व्हिडीओकॉन ग्रुपला नियम धाब्यावर बसवून ३०० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केल्याप्रकरणी सीबीआयने त्यांच्यावर गुन्हा नोंदविला.
व्हिडीओकॉनला ३०० कोटी रुपये कर्ज मंजूर केल्यावर दीपक कोचर यांच्या मालकीच्या कंपनीत ६४ कोटी रुपये ट्रान्सफर करण्यात आले, असे ईडीचे म्हणणे आहे.