नीरव मोदीच्या मेहुण्याची ईडीकडून चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:08 AM2021-09-08T04:08:37+5:302021-09-08T04:08:37+5:30
न्यायालयाच्या दिलासानंतर ईडी कार्यालयात हजर लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : न्यायालयातून दिलासा मिळताच पीएनबी बँक घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव ...
न्यायालयाच्या दिलासानंतर ईडी कार्यालयात हजर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : न्यायालयातून दिलासा मिळताच पीएनबी बँक घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा मेहुणा मैनक मेहता मंगळवारी ईडी अधिकाऱ्यांपुढे हजर झाला आहे. त्यानुसार ईडी अधिकारी त्याच्याकडे कसून चौकशी करत आहेत.
हिरे व्यापारी नीरव मोदी याने त्याचा मामा आणि गीतांजली ग्रुपचा मालक मेहुल चोक्सी याच्यासह पीएनबी बँकेच्या मुंबईतील ब्रिच कँडी शाखेचा तत्कालीन शाखा उपव्यवस्थापक शेट्टी याच्या मदतीने लेटर ऑफ अंडरटेकिंग मिळवून तब्बल ११ हजार ३०० कोटींचा घोटाळा केला. याप्रकरणी काळ्यापैशांविरोधातील कायद्यान्वये गुन्हा दाखल करून सक्तवसुली संचालनालयाने गुन्हा दाखल केला. तर बँकेचे ४ हजार ८८६.७२ कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी केंद्रीय तपास यंत्रणेने (सीबीआय) गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. याच प्रकरणात आयकर विभाग आणि केंद्रीय दक्षता आयोगसुद्धा तपास करत आहे.
बँकेला कोटींचा गंडा घालून चोक्सी आणि मोदी कुटुंबासह देशातून पसार झाले आहेत. वारंवार चौकशीचे समन्स बजावूनही हे आरोपी भारतात येऊन कोर्टापुढे आणि तपासयंत्रणेपुढे हजर होत नसल्याने त्यांच्या संपत्तीवर टाच आणण्याची प्रक्रिया तपास यंत्रणेने सुरू केली. नीरव मोदी हा सध्या लंडंनच्या जेलमध्ये असून केंद्र सरकार त्याला पुन्हा भारतात आणण्याच्या प्रयत्नात आहे.
नीरव मोदी याच्याविरोधातील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील आरोपी मैनक मेहता हे मंगळवारी पीएमएलए कोर्टापुढे हजर झाले. तेथे त्यांचा वारंट रद्द केल्यानंतर दुपारच्या सुमारास ईडी कार्यालयात हजर झाले. त्यानुसार ईडी अधिकारी त्यांच्याकडे कसून चौकशी करत आहेत. त्यांच्या चौकशीतून महत्त्वाची माहिती हाती लागण्याची शक्यता ईडी अधिकाऱ्याकडून वर्तविण्यात येत आहे.
मेहताची ४ तास चौकशी
नीरव मोदीचा मेहुणा मैनक मेहता सव्वा आठच्या सुमारास ईडी कार्यालयातून बाहेर पडले. त्यांची चार तास चौकशी झाली. पुढे गरज पडल्यास त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात येणार असल्याची माहिती ईडी सूत्रांनी दिली.