ईडीने केली तब्बल साडेआठ तास राज ठाकरेंची चौकशी; काय घडलं नेमकं बंद दरवाजाआड?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 09:19 PM2019-08-22T21:19:53+5:302019-08-22T21:20:29+5:30
कोहिनूर मिल कर्ज अनियमितता प्रकरणी राज ठाकरेंना पुन्हा पाचारण करण्याची शक्यता आहे.
मुंबई : गेल्या चार दिवसापासून राज्यात चर्चेचा विषय ठरलेल्या मनसेप्रमुखराज ठाकरे यांची कोहिनूर मिल कर्ज अनियमितता प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुरुवारी तब्बल पावणे नऊ तास कसून चौकशी केली. सकाळी साडेअकराच्या सुमारास कार्यालयात गेलेले राज ठाकरे रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास ते बाहेर पडले.या कालावधीत कोहिनूर स्केअर टॉवरमधील गुंतवणूक व भागीदारी मागे घेण्यामागील नेमकी कारणेबाबत त्यांच्याकडे प्रश्नांची सरबत्ती करण्यात आले. आवश्यकता वाटल्यास त्यांना पुन्हा चौकशीसाठी पाचारण करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, राज यांच्याकडे केल्या जाणाऱ्या चौकशीमुळे महानगरात निर्माण झालेला ‘हाय व्होल्टेज’वातावरण सायंकाळी निवळले. कडक बंदोबस्तामुळे कोणतीही अनुचित प्रकार घडला नाही. त्यामुळे पोलीस यंत्रणेने समाधानाचा सुस्कारा सोडला. दादर(प)शिवसेना भवनासमोरील कोहिनूर मिल-३ या चार जागेत उभारल्या जाणाऱ्या कोहिनूर स्केअर टॉवर या सुमारे २१०० कोटीच्या प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा ईडीला संशय आहे. इन्फ्रास्ट्रकचर लीजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेसद्वारे(आयएलएफएस) कंपनीचे थकीत कर्जाच्या अनुषंगाने कोहिनूर समूहाचे संचालक उन्मेष जोशी व अन्य भागीदार राजन शिरोडकर यांची गेली तीन दिवस चौकशी करण्यात आली. जोशी यांना जवळपास २४ तास तर शिरोडकर यांची १३ तास ईडीच्या कार्यालयात व्यतित करावे लागले असून येत्या सोमवारी (दि.२६) त्यांना चौकशीसाठी पाचारण करण्यात आले आहे.
गरज पडल्यास राज ठाकरेंना पुन्हा चौकशीसाठी बोलविणार; असा होता आजचा घटनाक्रम!#RajThackerayhttps://t.co/ebTxwvMMFL
— Lokmat (@MiLOKMAT) August 22, 2019
आज सकाळी साडेअकराच्या सुमारास राज ठाकरे व त्यांच्या कुटुंबीयांचा ताफा दक्षिण मुंबईतील बेलार्ड पियार्ड येथील कार्यालयाच्या परिसरात पोहचले. त्यानंतर राज यांना एकट्यानाच कार्यालयात प्रवेश देण्यात आला. त्यांची पत्नी शर्मिला, मुलगा अमित, सून, बहिण बाजूलाच असलेल्या ग्रॅण्ड हॉटेलात गेले. राज यांना पहिल्यादा ईडी कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर बसविण्यात आले. त्याठिकाणी अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून चौकशीला आल्याबद्दलची प्राथमिक माहिती भरुन घेण्यात आली. त्यानंतर सव्वा बाराच्या सुमारास त्यांना तिसºया मजल्यावरील चौकशी केल्या जाणाऱ्या कक्षामध्ये नेण्यात आली. याठिकाणी पश्चिम विभागाचे सहसंचालक सत्यभ्रता कुमार व अतिरिक्त संचालक संजय कश्यप व अन्य एका अधिकाऱ्याने त्यांच्याकडे विचारणा सुरु केली. ते देत असलेली माहिती अन्य दोघा अधिकाऱ्यांकडून नोंदवून घेतली जात होती.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राज ठाकरे यांची मातोश्री कंट्रक्शन कंपनी, त्याचे भाग भांडवल, त्यातील भागीदाराबद्दलची माहिती घेतली. त्यानंतर कोहिनूर स्क्वेअर टॉवर प्रकल्पातील कर्ज अनियमितताप्रकरणी विचारणा सुरु केली. त्यांच्यापुढे प्रश्नावली सादर करुन प्रत्येक प्रश्नाबाबत सविस्तर माहिती घेऊ लागले. दुपारी दीडपर्यत त्याबाबत विचारणा सुरु होती. त्यानंतर अधिकाऱ्यांनी जेवणासाठी थोडा वेळ चौकशी थांबविण्यात आली. दुपारी अडीचनंतर राज ठाकरे यांच्याकडे पुन्हा चौकशी सुरु करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार राज यांनी काही प्रश्नावर आपल्याला यासंबंधी काही माहिती नाही, कागदपत्रे पडताळून तपशिल देण्याची हमी दिली. राज यांच्याकडे रात्री सव्वा आठ वाजेपर्यत चौकशी चालली. त्यानंतर त्यांना सोडण्यात आले. मात्र अद्याप काही बाबींची चौकशी पूर्ण न झाल्याने त्यांना कागदपत्रासह पाचारण केले जाईल, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
राज यांच्याकडे चालेल्या दिर्घ चौकशीमध्ये अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे प्रश्नावली सादर करण्यात आली होती, त्यामध्ये विचारण्यात आलेली महत्वपूर्ण मुद्दे अशी :
* मातोश्री कंन्ट्रक्शनचे भागभांडवल, भागीदार कोण कोण आहेत.?
* कोहिनूर समूह ग्रूपमध्ये किती गुंतवणूक केली होती?
* भागीदारीचा हिस्सा किती होता ?
* अन्य कोण कोण भागीदार होते,त्यांचा हिस्सा किती होता ?
* कंपनीतील भागीदारी सोडण्याचे कारण काय ?
* भागीदारीचे समभाग किती रक्कमेत विकले ?
* या व्यवहारात आर्थिक फायदा की नुकसान झाले?
* कोहिनूर प्रकल्प तोट्यात जाण्याचे कारण काय ?
राज यांना घरचा डबा
ईडी कार्यालयात चौकशी सुरु असताना दुपारी सव्वा बाराच्या सुमारास त्यांना घरातून जेवणाचा डबा आणण्यात आला. दुपारी दोनच्या सुमारास जेवणासाठी थोडा वेळ चौकशी थांबविण्यात आली. त्यावेळी राज यांनी त्यातील थोडेसे खावून डबा तसाच ठेवून दिल्याचे समजते.
चौकशीवेळी राज यांची अस्वस्थता
ईडी कार्यालयात जवळपास साडे आठ तास व्यतित केलेले राज ठाकरे हे चौकशी दरम्यान अनेकवेळा अस्वस्थ झाले होते.अधिकाऱ्यांनी केलेल्या अनेक प्रश्नांना त्यांनी माहिती नाही, असे उत्तर दिल्याचे समजते. राज यांना धुम्रपानाची सवय आहे. मात्र चौकशीच्या पूर्ण कालावधीत त्यांना त्यापासून वंचित रहावे लागले होते. त्यामुळे ते अस्वस्थ झाले होते, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास बाहेर पडल्यानंतर पत्रकारांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी केवळ हात हालवून काहीही बोलण्यास नकार देत गाडीत बसून निघून गेले.
राज ठाकरे यांना सामान्य वागणूक
कोहिनूर स्केअ्र टॉवर्स या प्रकल्पातील गैरव्यवहाराप्रकरणी मनसे प्रमुख राज ठाकरे ईडीच्या कार्यालयात चौकशीला गेल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्यांना कोणतीही विशेष वागणूक दिली नाही. चौकशीला पाचारण केलेल्या अन्य व्यक्तीप्रमाणेच त्यांच्याशी वर्तुणूक ठेवली होती. दुपारच्या जेवणासाठी त्यांना घरातील डबा खाण्याची अनुमती वगळता अन्य कसलीही विशेष सवलत दिली गेली नसल्याचे समजते.
राज ठाकरे यांच्याकडे चौकशीला पाचारण केल्यानंतर मुंबईसह राज्यभरात मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यतेमुळे पोलिसांना दक्ष राहण्याचे आदेश दिले होते. त्यांचा मोठा दबाव पोलिसांवर पडला होता. राज ठाकरे यांना पुन्हा बोलाविल्यास मुंबई पोलिसांसह अन्य शहरातील पोलिसांवर ताण पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सर्व बाबीचा विचार करुन आवश्यकतेनुसार त्यांना बोलविले जाईल, असे ईडीतील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.