उन्मेष जोशींकडील ईडीचा चौकशीचा ससेमिरा कायम, चौथ्यावेळी आठ तास चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2019 08:56 PM2019-08-26T20:56:07+5:302019-08-26T21:29:45+5:30
शिवसेनेचे जेष्ठ नेते मनोहर जोशी व कोहिनूर समूहाचे संचालक उन्मेष जोशी यांच्याकडे सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) ससेमिरा अद्याप संपलेला नाही.
मुंबई : कोहिनूर मिल कर्ज प्रकरणातील अनियमिततेबाबत शिवसेनेचे जेष्ठ नेते मनोहर जोशी व कोहिनूर समूहाचे संचालक उन्मेष जोशी यांच्याकडे सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) ससेमिरा अद्याप संपलेला नाही. सोमवारी त्यांची पुन्हा जवळपास आठ तास चौकशी करण्यात आली. कोहिनूर मिल आणि त्यासंबंधीची कर्ज प्रकरणाची कागदपत्रे व अन्य दस्ताऐवज अधिका-यांकडून घेण्यात आला. अद्याप चौकशी पूर्ण झालेली नाही, त्यांना पुन्हा पाचारण करण्यात येणार असल्याचे ईडीतील सूत्रांकडून सांगण्यात आले.
दादर (प) शिवसेना भवनासमोरील कोहिनूर मिल-३ या जागेत उभारल्या जाणा-या कोहिनूर स्केअर टॉवरच्या २१०० कोटीच्या प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा ईडीला संशय आहे. इन्फ्रास्ट्रकचर लीजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेसद्वारे (आयएलएफएस) कंपनीचे थकीत कर्जाच्या अनुषंगाने मनसेप्रमुख व कोहिनूर समूहाचे तत्कालीन भागीदार राज ठाकरे यांच्यासह जोशी व शिरोडकर यांची चौकशी सुरू केली आहे. गेल्या आठवड्यात जोशी यांची तीन दिवस तर शिरोडकर यांची दोन दिवस चौकशी करण्यात आली होती. तर गुरुवारी राज ठाकरे यांच्याकडे तब्बल साडेआठ तास चौकशी केली आहे. त्यांनाही लवकरच पुन्हा चौकशीसाठी बोलाविण्यात येणार आहे. सोमवारी उन्मेष जोशी हे सकाळी अकराच्या सुमारास पुन्हा कार्यालयात आले. तिघा वरिष्ठ अधिका-यांकडून कसून चौकशी करण्यात आली. शिरोडकर यांनाही पुन्हा चौकशीसाठी पाचारण करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.