Join us

ईडीकडून प्रताप सरनाईक यांची साडेसहा तास कसून चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 4:24 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) टॉप सिक्युरिटीज कंपनीच्या कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी शिवसेनेचे आमदार प्रताप ...

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) टॉप सिक्युरिटीज कंपनीच्या कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची गुरुवारी सुमारे साडेसहा तास कसून चौकशी केली. त्यांच्या विविध व्यवसायातील गुंतवणुकीबरोबरच कौटुंबिक व राजकीय भूमिकेबद्दल अधिकाऱ्यांकडून प्रश्नांचा भडीमार करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर, चौकशी खेळीमेळीच्या वातावरणात झाली असून त्यांनी पुन्हा बोलविल्यास हजर होऊन सहकार्य करू, असे सरनाईक यांनी सांगितले.

ईडीने २४ नोव्हेंबरला सरनाईक यांच्या ठाणे व मुंबईतील घर व कार्यालयावर छापे टाकले होते. त्यांच्या टॉप्स सिक्युरिटीज ग्रुपमध्ये कोट्यवधींचा घोटाळा झाल्याची तक्रार आल्याने ही कारवाई करण्यात आली. त्यांचा मुलगा विहंग सरनाईक याला ताब्यात घेऊन ५ तास चौकशी केली होती. मात्र त्यांनतर अनेकदा समन्स बजावूनही सरनाईक पिता-पुत्रांनी कार्यालयात जाण्याचे टाळले होते. त्यानंतर गुरुवार, १० डिसेंबरला हजर राहण्याबाबत नोटीस बजाविण्यात आली हाेती.

मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने सरनाईक यांना अटक न करण्याचे निर्देश ईडीला दिले होते. त्यानंतर सरनाईक गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास बेलार्ड पियार्ड येथील ईडीच्या कार्यालयात हजर झाले. आधिकाऱ्यांनी त्यांचे विविध व्यवसाय, टॉप्स सिक्युरिटीज कंपनीसह विविध कंपन्यातील आर्थिक गुंतवणूक, वार्षिक उलाढालीबद्दल सविस्तर माहिती विचारली. त्यांची राजकीय, सामाजिक व कौटुंबिक पार्श्वभूमी जाणून घेतली. सुमारे साडेसहा तास ही चौकशी सुरू होती. साडेपाचच्या सुमारास ते कार्यालयातून बाहेर पडले. त्यांच्या चेहऱ्यावर कसलाही तणाव दिसत नव्हता.

दरम्यान, सरनाईक यांचे निकटवर्तीय व टॉप्स सिक्युरिटीज समूहाचे प्रवर्तक अमित चांडाेळे यांना यापूर्वी अटक करण्यात आली आहे.

......................................

-------------------

..तर दोन तासात हजर होऊ- सरनाईक

ईडीने आपल्याला विचारलेल्या सर्व प्रश्नांची आपण उत्तरे दिली आहेत. त्यावर त्यांचे समाधान झाले की नाही हे मला माहीत नाही, मात्र त्यांनी आपल्याला पुन्हा किंवा कुटुंबातील कोणालाही बोलविल्यास दोन तासात हजर राहू, असे प्रताप सरनाईक यांनी ईडीच्या चौकशीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. तपास यंत्रणेला आपले सर्व सहकार्य आहे. सर्व भ्रष्टाचाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे. त्यासाठी परदेशात असलेल्यानाही पकडून आणले पाहिजे. अशी आपली भूमिका आहे, आधिकार्यानी आपल्याला नोटीस, समन्स नव्हे तर इमेल पाठविला तरी हजर राहू असे त्यांनी सांगितले.