ईडीकडून वर्षा राऊत यांची साडेतीन तास चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:14 AM2021-01-08T04:14:55+5:302021-01-08T04:14:55+5:30

पीएमसी बँक घोटाळा प्रकरण लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पीएमसी बँक गैरव्यवहारप्रकरणी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी ...

ED interrogates Varsha Raut for three and a half hours | ईडीकडून वर्षा राऊत यांची साडेतीन तास चौकशी

ईडीकडून वर्षा राऊत यांची साडेतीन तास चौकशी

Next

पीएमसी बँक घोटाळा प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : पीएमसी बँक गैरव्यवहारप्रकरणी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनी अखेर सोमवारी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात हजेरी लावली. सुमारे साडेतीन तास त्यांची चौकशी करण्यात आली. आवश्यकता भासल्यास त्यांना परत बोलावले जाईल, असे ईडीतील सूत्राकडून सांगण्यात आले.

वर्षा राऊत यांना ५ जानेवारीला हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते. मात्र, एक दिवस आधीच त्या ईडी कार्यालयात हजर झाल्या. ईडी कार्यालय परिसरात शिवसैनिक मोठ्या संख्येने जमून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता होती, त्यामुळे पोलिसांच्या सूचनेनुसार एक दिवस आधीच त्यांची चौकशी करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

पीएमसी बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल असलेल्या प्रवीण राऊत यांच्या खात्यातून वर्षा राऊत यांच्या खात्यावर ५५ लाख रुपये जमा करण्यात आले होते. तसेच त्यांच्या चार कंपन्यांमध्ये त्या भागीदार असल्याने मनी लाँड्रिंगद्वारे घोटाळ्यातील रक्कम त्यांच्याकडे वळविण्यात आल्याचा संशय आहे. त्याअनुषंगाने सोमवारी वर्षा यांच्याकडे विचारणा करण्यात आली. वर्षा यांनी आपले म्हणणे लेखी स्वरूपात दिल्याचे समजते.

सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास त्या दक्षिण मुंबईतील बेलार्ड पियार्ड येथील ईडीच्या कार्यालयात पोहोचल्या. सुमारे साडेतीन तासांच्या चौकशीनंतर साडेसहाच्या सुमारास त्या तेथून बाहेर पडल्या. त्यानंतर पत्रकारांशी काहीही बोलण्यास नकार देत त्या गाडीत बसून निघून गेल्या.

ईडीने तीन दिवसांपूर्वी प्रवीण राऊत यांची ७२ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे.

ईडीच्या कार्यालयाबाहेर शिवसैनिकांची गर्दी

वर्षा राऊत सोमवारी दुपारी ईडीच्या कार्यालयात गेल्याचे समजल्यानंतर काही शिवसैनिक तेथे पोहोचले. बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी त्यांना कार्यालयाच्या शंभर मीटर दूर अडविले. जमावबंदी लागू असल्याने त्यांना कलम १६६ अन्वये नोटीस देण्यात आली. काही काळ भाजप व ईडीच्या विरुद्ध घोषणाबाजी करीत शिवसैनिक तेथून निघून गेले.

Web Title: ED interrogates Varsha Raut for three and a half hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.