अनिल अंबानी यांची दोन तास ईडी चौकशी; परदेशी विनिमय चलन कायद्याचे उल्लंघन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2023 07:36 AM2023-07-04T07:36:03+5:302023-07-04T07:36:09+5:30
अनिल अंबानी कर्मचाऱ्यांसह सोमवारी बॅलार्ड इस्टेट येथील ईडीच्या कार्यालयात दाखल झाले.
मुंबई : परदेशी विनिमय चलन कायद्याचे (फेमा) कथित उल्लंघन केल्याप्रकरणी उद्योगपती अनिल अंबानी यांची सोमवारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) चौकशी करीत त्यांचा जबाब नोंदविला.
अनिल अंबानी कर्मचाऱ्यांसह सोमवारी बॅलार्ड इस्टेट येथील ईडीच्या कार्यालयात दाखल झाले. सुमारे दोन तास अंबानी यांची चौकशी चालली. रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी समूहाचे अध्यक्ष असलेल्या अनिल अंबानी यांचा नेमक्या कोणत्या प्रकरणात जबाब नोंदविण्यात आला याची माहिती उपलब्ध नसली तरी फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याचा ठपका ईडीने त्यांच्यावर ठेवला आहे. यापूर्वीही २०२० मध्ये येस बँकेत झालेल्या घोटाळ्याप्रकरणी ईडीने अनिल अंबानी यांची चौकशी केली होती.
गेल्या काही वर्षांपासून आर्थिक संकटात सापडलेल्या अनिल अंबानी यांना गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात आयकर विभागानेही नोटीस जारी केली होती. त्यांनी स्वीस बँकेतील दोन खात्यांत ८१४ कोटी रुपये ठेवले होते व त्यावर लागू असलेला ४२० कोटी रुपयांचा कर चुकविल्याचा ठपका ठेवत काळ्या पैशांच्या कायद्यांतर्गत आयकर विभागाने त्यांना नोटीस जारी केली होती.