कथित बॉडी बॅग्ज घोटाळा प्रकरणात माजी महापौर किशोरी पेडणेकरांची ६ तास ईडी चौकशी
By मनोज गडनीस | Published: November 23, 2023 07:53 PM2023-11-23T19:53:15+5:302023-11-23T19:54:17+5:30
या प्रकरणी ८ नोव्हेंबर रोजी त्यांना सर्वप्रथम समन्स जारी करण्यात आले होते. मात्र, त्यांनी वकिलामार्फत मुदतवाढ मागितली होती
मुंबई - कोविड काळामध्ये मुंबई महानगरपालिकेने खरेदी केलेल्या बॉडी बॅग्जमध्ये झालेल्या कथित घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ने मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची गुरुवारी सहा तास चौकशी केली. दुपारी सव्वा बाराच्या दरम्यान किशोरी पेडणेकर ईडीच्या कार्यालयात दाखल झाल्या. सायंकाळी सहा वाजता त्या तेथून बाहेर पडल्या.
या प्रकरणी ८ नोव्हेंबर रोजी त्यांना सर्वप्रथम समन्स जारी करण्यात आले होते. मात्र, त्यांनी वकिलामार्फत मुदतवाढ मागितली होती. त्यानंतर २३ नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी त्यांना ११ नोव्हेंबर रोजी पुन्हा समन्स जारी करण्यात आले होते. त्यानुसार गुरुवारी त्या चौकशीसाठी उपस्थित राहिल्या. या प्रकरणी आपण कोणतेही आदेश दिले नसल्याचे सांगत आपल्यावरील आरोपांचा किशोरी पेडणेकर यांनी ईडी चौकशीमध्ये इन्कार केल्याची माहिती सुत्रांनी दिली. कोविड काळामध्ये खरेदी झालेल्या बॉडी बॅग्स या एका खाजगी कंपनीकडून मुंबई महानगरपालिकेने तिप्पट दराने खरेदी केल्याचा आरोप करत या प्रकरणी ४ ऑगस्ट रोजी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा नोंदवला होता. याच गुन्ह्याच्या आधारे ईडी या प्रकरणाचा तपास करत आहे.