हिरानंदानी यांची १० तास ईडी चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2024 02:10 PM2024-03-05T14:10:25+5:302024-03-05T14:11:03+5:30

मात्र, या चौकशीचा या प्रकरणाशी संबंध नसल्याचे ईडीच्या सूत्रांनी वृत्तसंस्थेशी बोलताना स्पष्ट केले आहे. 

ED interrogation of Hiranandani for 10 hours | हिरानंदानी यांची १० तास ईडी चौकशी

हिरानंदानी यांची १० तास ईडी चौकशी

मुंबई : परकीय चलन व्यवस्थापन कायद्याचे (फेमा) उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत ईडीने (सक्तवसुली संचालनालय) सोमवारी हिरानंदानी समूहाचे प्रवर्तक निरंजन हिरानंदानी यांची १० तास चौकशी केली. याप्रकरणी २२ फेब्रुवारी रोजी ईडीच्या अधिकाऱ्यांनी कंपनीच्या मुख्यालयासह मुंबईत एकूण पाच ठिकाणी छापेमारी केली होती.

पवई, नरिमन पॉइंट, मलबार हिल, मुलुंड व पनवेल येथे छापेमारी झाली होती. तसेच, त्याचवेळी निरंजन व त्यांचे पुत्र दर्शन यांना चौकशीसाठी बोलावले होते. कर सुलभ देशांत एका ट्रस्टमध्ये हिरानंदानी व कुटुंबांनी गुंतवणूक केली असून ते त्याचे प्रवर्तक आहेत व तिथे त्यांना आर्थिक फायदा झाल्याचा संशय ईडीच्या अधिकाऱ्यांना आहे. तसेच, तिथे मिळालेल्या आर्थिक लाभात परदेशी चलन व्यवस्थापन कायद्याचा भंग झाला आहे का, याची तपासणी प्रामुख्याने ईडीचे अधिकारी करत असल्याची माहिती आहे. प्राप्त माहितीनुसार, २००६ ते २००८ मध्ये हिरानंदानी समूहाने ब्रिटिश व्हर्जिन आयलंड येथे २५ कंपन्या व एका ट्रस्टची देखील स्थापना केली होती. त्यांनी परदेशातून ४०० कोटी रुपये थेट परकीय गुंतवणुकीच्या माध्यमातून भारतात आणत महाराष्ट्र व तामिळनाडू येथील गृहनिर्माण प्रकल्पांत त्यांची गुंतवणूक केली होती. मात्र, ही परकीय गुंतवणूक भारतात आणताना त्यांनी सरकारच्या निर्धारित प्रक्रियेचे पालन न केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवल्याचे समजते. विशेष म्हणजे, ऋणवसुली प्राधिकरणात कंपनीच्या गृहनिर्माण प्रकल्पाचा लिलाव झाला त्यावेळी त्यांच्याच समूहातील एका कंपनीने या प्रकल्पाची खरेदी केल्याची माहिती आहे. 

अलीकडेच लोकसभेत तृणमूल काँग्रेसच्या माजी खासदार महुआ मोईत्रा यांच्या कॅश फॉर क्वेरी प्रकरणामध्ये निरंजन हिरानंदानी यांचे पुत्र दर्शन हिरानंदानी यांचे नाव चर्चेत आले होते. मात्र, या चौकशीचा या प्रकरणाशी संबंध नसल्याचे ईडीच्या सूत्रांनी वृत्तसंस्थेशी बोलताना स्पष्ट केले आहे. 

आतापर्यंत का निदर्शनास आले नाही?
हे प्रकरण १६ वर्षे जुने असून आतापर्यंत ४२ वेळा या प्रकरणाची पडताळणी झाली आहे. जर काही चूक असेल तर आतापर्यंत ते का निदर्शनास आले नाही, मी तपास यंत्रणेला पूर्णपणे सहकार्य करत आहे, अशी प्रतिक्रिया निरंजन हिरानंदानी यांनी ईडी कार्यालयातून बाहेर पडताना दिली.
 

Web Title: ED interrogation of Hiranandani for 10 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.