संजय राऊत यांची आज ईडी चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 05:41 AM2022-07-27T05:41:47+5:302022-07-27T05:42:18+5:30
सध्या संसदेचे अधिवेशन सुरू असल्याने राऊत चौकशीसाठी बुधवारी उपस्थित राहणार की गेल्या वेळेप्रमाणेच वकिलांमार्फत मुदतवाढीचा अर्ज करणार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पत्राचाळ पुनर्विकासप्रकरणी ईडीने जारी केलेल्या समन्सच्या अनुषंगाने शिवसेना खासदार संजय राऊत यांची बुधवारी चौकशी होणार आहे. राऊत यांना सकाळी ११ वाजता चौकशीसाठी बोलाविण्यात आले आहे.
सध्या संसदेचे अधिवेशन सुरू असल्याने राऊत चौकशीसाठी बुधवारी उपस्थित राहणार की गेल्या वेळेप्रमाणेच वकिलांमार्फत मुदतवाढीचा अर्ज करणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, १९ जुलै रोजी त्यांना ईडीने समन्स जारी केले होते त्यावेळी संसदेचे अधिवेशन सुरू असल्याने राऊत यांच्या वतीने त्यांच्या वकिलांनी ईडी कार्यालयात जाऊन राऊत यांना चौकशीसाठी ७ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचे पत्र अधिकाऱ्यांना सादर केले होते. मात्र, ही मागणी ईडीने फेटाळत त्यांना २७ जुलै रोजी चौकशीसाठी हजर राहावे लागेल, असे स्पष्ट केले होते. दरम्यान, ईडीने कितीही चौकशी केली तरी आपण पक्ष सोडणार नसल्याची प्रतिक्रिया राऊत यांनी दिल्लीत मंगळवारी दिली.