लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गोरेगाव येथील पत्राचाळ पुनर्विकासामध्ये १०३९ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा ठपका ठेवत ईडीने बुधवारी शिवसेना नेते संजय राऊत यांना चौकशीसाठी बोलावले आहे. यापूर्वी याच प्रकरणात २८ जून रोजी राऊत यांना ईडीने समन्स जारी केले होते. त्यावेळी ते अनुपस्थित राहिले होते. मात्र, दुसऱ्या दिवशी त्यांच्या वकिलाने राऊत यांना मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. ही मागणी ईडीने फेटाळत १ जुलै रोजी हजर राहण्याचे दुसरे समन्स जारी केले होते. १ जुलै रोजी राऊत यांची ईडी कार्यालयात तब्बल १० तास चौकशी झाली होती.
गोरेगावच्या पत्राचाळ पुनर्विकासामध्ये १०३९ कोटी ७९ लाख रुपयांचा घोटाळा झाल्याच्या आरोप करत २०१८ मध्ये मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. संजय राऊत यांचे निकटवर्तीय आणि गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे माजी संचालक प्रवीण राऊत, राकेश कुमार वाधवान, सारंग कुमार वाधवान यांच्या विरोधात ही तक्रार म्हाडा अधिकाऱ्यांनी दिली होती. या घोटाळ्याची आर्थिक व्याप्ती मोठी असल्याने याप्रकरणी ईडीने चौकशीची सूत्रे हाती घेतली आणि ईडीने केलेल्या चौकशीदरम्यान त्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाल्याचे दिसून आले.