मुंबई - कोरोनाकाळात मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्त असलेले संजीव जयस्वाल अखेर शुक्रवारी ईडीच्या चौकशीला सामोरे गेले. सकाळी साडेअकरा वाजता ते ईडीच्या बॅलाई इस्टेट येथील कार्यालयात दाखल झाले. तब्बल साडेदहा तास त्यांची चौकशी चालली. - यापूर्वी दोन वेळा ईडीने त्यांना चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, दोन्ही वेळेस ते गैरहजर राहिले होते. त्यानंतर ईडीने शुक्रवारी त्यांना हजर राहण्यासाठी तिसऱ्यांदा समन्स जारी केले होते.
कोरोनाकाळात आरोग्यविषयक सेवा, कर्मचारी, अत्यावश्यक उपकरणे यांच्यासाठी मुंबई महापालिकेने कंत्राट जारी केले होते. सध्या म्हाडाच्या मुख्य कार्यकारी पदावर असलेले आणि १९९६ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेले संजीव जयस्वाल त्यावेळी महापालिकेत अतिरिक्त आयुक्त पदावर कार्यरत होते. त्यावेळी त्यांनी हे कंत्राट लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस या कंपनीला दिले होते. या कंपनीचे प्रवर्तक शिवसेना नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर आहेत. या कंपनीला कंत्राट देतेवेळी जयस्वाल यांनी संबंधित सर्व कायदेशीर प्रक्रियेचे पालन केले होते किंवा कसे, याचा तपास ईडी करत आहे. या प्रकरणात मुंबई महापालिका ते लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस यांच्यात झालेल्या ३० कोटी रुपयांच्या व्यवहारांचे तपशील देखील हाती लागल्याचा दावा ईडीने केला आहे. तसेच, केलेल्या खर्चाचा तपशील देण्यासंदर्भात ईडीने महापालिकेला पत्रही लिहिले आहे.
मी चौकशीला पूर्ण सहकार्य केले आहे. मला विचारण्यात आलेल्या सर्व प्रश्नांना उत्तरे दिली. मला यापूर्वीही बोलावण्यात आले होते परंतु तब्येत बरी नसल्याने जाऊ शकलो नव्हतो. मला चौकशीसाठी पुन्हा बोलावलेले नाही परंतु बोलावल्यास मी तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य करेन.- संजीव जयस्वाल(मुंबई महापालिकेचे माजी अतिरिक्त आयुक्त)