मनोहर जोशींचे पुत्र उन्मेष यांची ईडीकडून आठ तास कसून चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 07:02 AM2019-08-20T07:02:09+5:302019-08-20T07:04:30+5:30

सकाळी ११ वाजता कार्यालयात गेलेले जोशी रात्री सव्वासातच्या सुमारास तेथून बाहेर पडले.

 ED investigating Manohar Joshi's son, Umesh, for eight hours | मनोहर जोशींचे पुत्र उन्मेष यांची ईडीकडून आठ तास कसून चौकशी

मनोहर जोशींचे पुत्र उन्मेष यांची ईडीकडून आठ तास कसून चौकशी

googlenewsNext

मुंबई : कोहिनूर मिल कर्ज प्रकरणातील अनियमिततेबाबत या कंपनीचे तत्कालीन भागीदार आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) चौकशीसाठी पाचारण केले आहे. येत्या गुरुवारी (दि. २२) दक्षिण मुंबईतील कार्यालयात हजर राहण्याबाबत समन्स बजाविण्यात आले असून या प्रकरणी माजी मुख्यमंत्री व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचे पुत्र उन्मेष जोशी यांची सोमवारी तब्बल आठ तास कसून चौकशी करण्यात आली.

सकाळी ११ वाजता कार्यालयात गेलेले जोशी रात्री सव्वासातच्या सुमारास तेथून बाहेर पडले. आवश्यकता वाटल्यास त्यांना चौकशीसाठी पुन्हा पाचारण करण्यात येईल, असे ईडीतील सूत्रांकडून सांगण्यात आले. सरकारी क्षेत्रातील कंपनी इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अ‍ॅण्ड फायनान्शियल सर्व्हिसेसद्वारे (आयएलएफएस) मुंबईतील कोहिनूर सीटीएनएल कंपनीला दिलेल्या ८६० कोटी रुपयांचे कर्ज आणि गुंतवणूक प्रकरणाची चौकशी ईडीने गेल्या महिन्याच्या अखेरपासून सुरू केली आहे. या प्रकरणात मनोहर जोशी यांचे पुत्र व कोहिनूर ग्रुपचे संचालक उन्मेष जोशी आणि राज ठाकरे यांच्या भागीदारीतील कोहिनूर समूहाने हा प्रकल्प राबविण्यासाठी घेतला होता.

दादरमधील शिवसेना भवनासमोर ‘कोहिनूर स्क्वेअर’ हा टॉवर उभारला जात आहे. मात्र त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता व गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे. त्यामुळे ईडीकडून त्याची चौकशी करण्यात आली. त्याअंतर्गत शुक्रवारी रात्री जोशी यांना कार्यालयात हजर राहण्याबाबत नोटीस बजाविली होती. त्यानुसार सोमवारी सकाळी ते कार्यालयात हजर झाले. त्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, ‘कोहिनूर स्क्वेअर टॉवर प्रकरणी चौकशीला बोलाविले आहे. त्याबाबत कोणतीही प्रश्नावली पाठविलेली नव्हती. आपण तपास यंत्रणेला सर्व प्रकारे साहाय्य करणार आहोत.’ ईडीच्या अधिकाऱ्यांनी सुमारे आठ तास त्यांना कोहिनूर व्यवहाराबाबत सविस्तर विचारणा केली. सायंकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास ते कार्यालयाच्या इमारतीतून बाहेर पडले.
मिळालेल्या माहितीनुसार, ईडीने प्रश्नावलीचा एक संच बनवून त्यांचा जबाब नोंदविण्यात आला. या प्रकरणातील अन्य संशयितांनी व साक्षीदारांनी दिलेल्या माहितीच्या आधारे ही प्रश्नावली बनविण्यात आली होती.

काय आहे प्रकरण?
- मुंबईतील मध्यवर्ती व मोक्याचा भाग असलेल्या दादर (प.)मधील शिवसेना भवनासमोरील कोहिनूर मिल-३ या जागेचा सुमारे १२ वर्षांपूर्वी लिलाव झाला होता. तो भूखंड उन्मेष जोशी, राज ठाकरे व राजेंद्र शिरोडकर यांची समान भागीदारी असलेल्या कोहिनूर ग्रुप कंपनीने ४२१ कोटींना विकत घेतला. त्यामध्ये आयएलएफएस या कंपनीने ५० टक्के भागीदारी घेत थेट २२५ कोटी रुपये गुंतविले होते.
- येथे सुमारे २१०० कोटींचा प्रकल्प उभारण्याचे निश्चित करण्यात आले. मात्र अवघ्या दीड वर्षात कंपनीने आपला हिस्सा अवघ्या ९० कोटींमध्ये विकला. त्यानंतरही कंपनीने प्रकल्पासाठी ८६० कोटींचे कर्ज कोहिनूर ग्रुपला दिले.
- २००८ मध्ये राज ठाकरे यांनीही आपले शेअर्स विकून ते यातून बाहेर पडले. उन्मेष जोशी यांना ९०० कोटींचे कर्ज न फेडता आल्याने कंपनीने त्यांच्याकडे तगादा लावला. दरम्यान, वसुलीसाठी त्यांनी जून २०१७ मध्ये केंद्रीय विधि प्राधिकरणाकडे धाव घेतली. त्या ठिकाणी झालेल्या सुनावणीतून प्रभादेवी येथील शिर्के अ‍ॅण्ड असोसिएट्स या कंपनीला भूखंड देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे मध्यंतरीच्या काळात बंद असलेल्या या प्रकल्पाचे काम गेल्या पाच महिन्यांपासून पुन्हा सुरू झाले आहे.

असा आहे कोहिनूर स्क्वेअर प्रकल्प
- दादरसारख्या मोक्याच्या ठिकाणी ५२ आणि ३५ मजल्यांच्या दोन जुळ्या टॉवरसाठीचा २१०० कोटींचा प्रकल्प.
- मुख्य इमारतीतील पहिल्या पाच मजल्यांवर अत्याधुनिक शॉपिंग मॉल्स, उर्वरित ४७ मजले सिंगापूर ब्रॅण्डचे ‘आयू मुंबई’ हे पंचतारांकित हॉटेल तसेच व्यापारी सदनिका.
- जुळ्या इमारतींतील पहिले १५ मजले दोन्ही टॉवर्सच्या र्पाकिंगसाठी, तब्बल दोन हजार वाहनांची व्यवस्था. उर्वरित २० मजल्यांवर आलिशान फ्लॅट्स.
- शिर्के असोसिएट्सकडून येत्या दीड वर्षात संपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

राज ठाकरेंची चौकशी : कोहिनूर समूहामधून राज ठाकरे आपले शेअर्स विकून बाहेर का पडले, हा प्रश्न अनुत्तरित आहे. आयएलएफएस कंपनीने २२५ कोटी रुपये गुंतवून ५० टक्के भागीदारी घेतली असताना त्यांनी अवघ्या ९० कोटींमध्ये शेअर्स का विकले? त्यानंतर वर्षभरात राज ठाकरे यातून बाहेर का पडले? आर्थिक अनियमिततेमागील नेमके कारण काय? याबाबत तपास यंत्रणेला त्यांच्याकडे चौकशी करायची असल्याचे सांगण्यात आले.

Web Title:  ED investigating Manohar Joshi's son, Umesh, for eight hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.