मुंबई - माजी केंद्रीय उड्डाणमंत्री प्रफ्फुल पटेल यांची कंपनीचे दाऊद इब्राहिमच्या सहकाऱ्यासोबत आर्थिक आणि जमीन व्यवहार केल्याच्या प्रकरणाची ईडीकडून चौकशी सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांची कंपनी आणि कुख्यात इकबाल मेमन यांच्यामध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे.
प्रफुल्ल पटेल यांची प्रमोटेड कंपनी मिलेनियम डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि मिर्ची परिवारामध्ये झालेल्या कायदेशीर कंत्राटाची चौकशी ईडीकडून करण्यात येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या व्यवहारात पटेल यांच्या कंपनीला इकबाल मेमन यांच्या मिर्ची कंपनीकडून एक प्लॉट देण्यात आला होता. हा प्लॉट वरळीतील नेहरु तारांगणच्या समोर असलेल्या प्राइम लोकेशनला आहे. या प्लॉटवर मिलेनियम डेव्हलपर्सकडून 15 मजल्याची व्यावसायिक आणि रहिवाशी इमारत बनविण्याचं काम सुरु आहे.
मागील दोन आठवड्यापासून मुंबई ते बंगळुरुमध्ये ईडीकडून 11 ठिकाणी धाड टाकण्यात आल्या. यावेळी छापेमारीत मिळालेल्या कागदपत्राच्या आधारे ईडीकडून तपास सुरु करण्यात आला आहे. डिजिटल पुरावे, ईमेल आणि कागदपत्रे जमा करुन 18 लोकांची साक्षही घेण्यात आली आहे. या कागदपत्राच्या आधारे प्रफुल्ल पटेल यांच्या कंपनीला देण्यात आलेला प्लॉट इकबाल मेमनच्या पत्नी हजरा मेमन यांच्या नावावर होता.
इतकचं नाही तर पुनर्विकासाच्या नावाखाली देण्यात आलेल्या या प्लॉटवरुन दोन्ही पक्षकारांमध्ये कायदेशीर कंत्राट झाल्याचे कागदपत्र आहेत. 2006-07 मध्ये झालेल्या कंत्राटानुसार या इमारतीमधील 2 मजले इकबाल मेमन यांच्या पत्नीच्या नावे करण्यात आलेले आहेत. ईडी सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे इमारतीतील या मजल्यांची किंमत 200 कोटी रुपये इतकी आहे. प्रफुल्ल पटेल आणि त्यांच्या पत्नी मिलेनियम डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये शेअरहोल्डर्स आहेत. चौकशीसाठी ईडीकडून प्रफुल्ल पटेल आणि त्यांच्या कुटुंबीयांना कळविण्यात आल्याचीही माहिती आहे. तसेच ईडीच्या चौकशीत प्रफुल्ल पटेल आणि त्यांच्या पत्नीला विचारण्यात येईल की, या इमारतीतील 2 मजले हजरा मेमन यांना का देण्यात आले. तसेच या व्यवहारात अन्य कोणत्या आर्थिक बाबी जोडल्या गेल्या आहेत का? याबाबत त्यांना विचारणा करण्यात येईल असं ईडीच्या सूत्रांनी सांगितलं आहे.