Join us

अंबर दलालशी निगडित मालमत्तांवर ईडीचे देशभरात छापे, बँक खात्यातील दोन कोटी जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2024 7:29 AM

ED Raids News: भांडवली बाजारातील गुंतवणुकीवर २२ टक्क्यांच्या अवास्तव परताव्याचे आमिष दाखवत गुंतवणूकदारांना ६०० कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या अंबर दलाल याच्याशी निगडित काही ठिकाणी मुंबई व कोलकाता येथे ईडीने छापेमारी केली आहे.

मुंबई  - भांडवली बाजारातील गुंतवणुकीवर २२ टक्क्यांच्या अवास्तव परताव्याचे आमिष दाखवत गुंतवणूकदारांना ६०० कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या अंबर दलाल याच्याशी निगडित काही ठिकाणी मुंबई व कोलकाता येथे ईडीने छापेमारी केली आहे. या छापेमारीदरम्यान त्याच्या बँक खात्यातील, डीमॅट खात्यातील आणि रोख असे एकूण दोन कोटी रुपये ईडीने जप्त केले आहेत. या प्रकरणी आतापर्यंत एकूण ३९ कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. 

हीच कार्यपद्धती वापरून त्याने यूएई आणि अमेरिकेतील लोकांकडून देखील गुंतवणुकीसाठी पैसे मिळवले होते. सुरुवातीला नवा गुंतवणूकदार आला की तो त्या आधी आलेल्या गुंतवणूकदाराला परतावा देत होता. मात्र, कालांतराने त्याने गुंतवणूकदारांच्या पैशांतून आपल्या परदेशात मालमत्तांची खरेदी केल्याचे निदर्शनास आले. भारतात आणि दुबईत त्याने या मालमत्तांची खरेदी केली आहे. 

फसवणूक झाल्यानंतर याप्रकरणी सर्वप्रथम मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला होता. मात्र, यामध्ये मनी लाँड्रिंग झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर ईडीने याचा तपास सुरू केला आहे.

 व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या अंबर दलाल याने भांडवली बाजारातील गुंतवणुकीवर भरघोस परताव्याचे आमिष देत एकूण १३०० गुंतवणूकदारांकडून ६०० कोटी रुपये गोळा केले होते. त्याच्या गुंतवणूकदारांमध्ये बॉलीवूडमधील काही कलाकारांचाही समावेश आहे.    सोने, चांदी, खनिज तेल, नैसर्गिक वायू, तांबे, पितळ यासह भांडवली बाजारातील उत्पादनांत गुंतवणूक करत त्यावर १८ ते २२ टक्क्यांचा परतावा देण्याचे आमिष त्याने गुंतवणूकदारांना दिले  होते.

टॅग्स :अंमलबजावणी संचालनालय