ED notice To Anil Parab: राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) नोटीस बजावल्याची माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. राऊत यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं असून ईडीच्या नोटीसवरुन भाजपवर हल्लाबोल केला आहे.
"शाब्बास! जन आशीर्वाद जत्रेची सांगता होताच अपेक्षेप्रमाणे अनिल परब यांना ईडीची नोटीस बजावण्यात आली आहे. वरचे सरकार कामाला लागले. भुकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता. परब हे रत्नागिरीचे पालकमंत्री आहे. क्रोनोलॉजी कृपया समज लिजीये. कायदेशीर लढाई कायद्यानेच लढू...जय महाराष्ट्र", असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.
अनिल परब यांनीच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेसाठी दबाव आणल्याचा आरोप भाजपनं एका ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून केला आहे. अनिल परब यांचं एका पत्रकार परिषदेवेळी फोनवरील संवाद व्हायरल झाला होता. त्यावरुन अनिल परब यांनीच राणेंना अटक करण्यासाठी पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप केला जात आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी याप्रकरणाची सीबीआय चौकशी देखील मागणी केली होती. त्यानंतर आता अनिल परब यांना ईडीची नोटीस आल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.
नारायण राणे यांच्या अटकेचा वचपा काढण्यासाठी केंद्रातील सरकारनं अनिल परब यांच्या मागे ईडीचा ससेमिरा सुरू केल्याचा आरोप आता संजय राऊत यांनी ट्विटमधून केला आहे.