Join us

ईडीच्या अधिकाऱ्यांनी मला अनेक तास बसवून ठेवले

By admin | Published: March 18, 2016 2:25 AM

थकलेल्या व चेहरा निस्तेज झालेल्या छगन भुजबळ यांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. आर. भावके यांनी तुमची सक्तवसुली संचालनालयाबद्दल (ईडी) काही तक्रार आहे का, असे विचारल्यावर

- डिप्पी वांकाणी,  मुंबईथकलेल्या व चेहरा निस्तेज झालेल्या छगन भुजबळ यांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. आर. भावके यांनी तुमची सक्तवसुली संचालनालयाबद्दल (ईडी) काही तक्रार आहे का, असे विचारल्यावर त्यांनी आपली बाजू चांगली पाच मिनिटे मांडली. ते म्हणाले, ‘‘ईडीच्या अधिकाऱ्यांनी माझे म्हणणे नोंदवून न घेऊन वेळ वाया घालवला आणि मला अनेक तास बसवून ठेवले.’’ भुजबळ न्यायाधीशांना म्हणाले की, ‘‘मी उपमुख्यमंत्री होतो तेव्हा मला सकाळी लवकर निघणाऱ्या विमानाने जायचे असायचे म्हणून मी मुंबई एज्युकेशन ट्रस्टच्या (एमईटी) दहाव्या मजल्यावरील गेस्ट हाउसमध्ये ४ ते ५ वेळा थांबलो होतो. माझ्यावर ज्या माजी कर्मचाऱ्यांनी आरोप केले आहेत त्यांना भेटण्याचा कोणताही प्रसंग आलेला नव्हता.’’ या बातमीदाराने तुम्हाला न्यायालयीन कोठडी सुनावली गेली तेव्हा कसे वाटले असे विचारल्यावर भुजबळ यांनी ‘मी न्याय मिळवीन,’ असे सांगितले.बुधवारी दुपारी ४ वाजता मी छातीत दुखत असल्याची तक्रार केली होती. परंतु त्यांनी रात्री साडेनऊ वाजता डॉक्टरांना बोलावले. मला काही मोजकेच प्रश्न विचारले गेले पण खूप वेळ ताटकळत ठेवले गेले, असेही भुजबळ यांनी न्यायाधीशांना सांगितले. डॉक्टरांनी मला तपासल्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी रात्री साडेअकरा वाजता मला तुमचे म्हणणे नोंदवून घ्यायचे आहे, असे सांगितले. मी माझे निवेदन सकाळी लवकरच देतो असे मी त्यांना सांगितले. त्यानुसार गुरुवारी लवकरच तयार होऊन मी सकाळी साडेसात वाजता अधिकाऱ्याकडे गेलो परंतु त्यांनी मला प्रतीक्षा करायला लावली, असे भुजबळ म्हणाले. सकाळी साडेआठ वाजता मी दुसऱ्या अधिकाऱ्याकडे गेलो तेव्हा त्याने मला आधी नाश्ता करा, असे म्हटले. नंतर साडेनऊ वाजता त्यांनी माझे म्हणणे नोंदवून घ्यायला सुरुवात केली. परंतु माझ्यासमोर समीरला आणण्यात आले नाही. नंतर त्यांनी माझी वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर मला न्यायालयात आणले. मला त्यांनी हेतूत: प्रश्न उशिरा विचारले. मी पैसे कोठेही हवाला मार्गे वळविल्याचे साक्षीदार सांगत नाहीत, असे त्यांनी म्हटले. ‘‘एमईटीच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या आरोपांबद्दल बोलायचे तर त्यांनी माझ्याविरुद्ध केलेल्या सगळ्या कथा बनावट आहेत. एमईटीच्या वांद्र्यातील कार्यालयाच्या दहाव्या मजल्यावरील गेस्ट हाउसमध्ये मी चार ते पाच वेळा झोपलो होतो. विमानतळापासून हे गेस्ट हाउस जवळ आहे व मला सकाळी लवकर निघणाऱ्या विमानाने जावे लागायचे. सुमारे साडेदहा वाजता जेवण केल्यानंतर अनेक वेळा रामटेक बंगल्यावरून एमईटी कार्यालयाला जायला बराच वेळ मला लागायचा, परंतु तेव्हा कार्यालय बंद होऊन कर्मचारी घरी गेलेले असायचे. मग प्रश्न असा आहे की त्यांच्यापैकी कोणाला मी भेटायचा किंवा ते सगळेच आधीच घरी गेलेले असताना मी कार्यालयात असल्याचे त्यांनी बघण्याचा प्रश्न उपस्थितच होत नाही.’’ मी कधीही कोणावर दडपण आणले नाही की मी काही चुकीचे केले नाही, असे ते म्हणाले.मी कधीही कोणावर दडपण आणले नाही की मी काही चुकीचे केले नाही, असे छगन भुजबळ यांनी सांगितले. भुजबळांचा पासपोर्ट जप्त केला जावा अशी हस्तक्षेप याचिका वकिलाने करताच भुजबळ ताडकन म्हणाले की, ‘‘मला बोलावल्यावर मी वॉशिंग्टनहून आलो. मी देशातून पळून का जाईन?’’