ईडीचे अधिकारी रोज जाणीवपूर्वक चौकशीसाठी बोलावतील, अनिल परब यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 07:25 AM2022-06-23T07:25:00+5:302022-06-23T07:25:35+5:30

Anil Parab: सध्याच्या राजकीय स्थितीत मला ईडीचे अधिकारी रोज जाणीवपूर्वक चौकशीसाठी बोलावतील, अशी प्रतिक्रिया परब यांनी ईडी कार्यालयातून रात्री साडेदहाच्या दरम्यान बाहेर पडते

ED officials will deliberately call for questioning every day, alleges Anil Parab | ईडीचे अधिकारी रोज जाणीवपूर्वक चौकशीसाठी बोलावतील, अनिल परब यांचा आरोप

ईडीचे अधिकारी रोज जाणीवपूर्वक चौकशीसाठी बोलावतील, अनिल परब यांचा आरोप

Next

मुंबई : दापोली येथील साई रिसॉर्टच्या बांधकामातील पैसा मनी लाँड्रिंगच्या माध्यमातून आल्याचा ठपका ठेवत ईडीने मंगळवारी १० तास चौकशी केल्यानंतर शिवसेना नेते अनिल परब यांची बुधवारी ईडीने पुन्हा सात तास चौकशी केली. सध्याच्या राजकीय स्थितीत मला ईडीचे अधिकारी रोज जाणीवपूर्वक चौकशीसाठी बोलावतील, अशी प्रतिक्रिया परब यांनी ईडी कार्यालयातून रात्री साडेदहाच्या दरम्यान बाहेर पडतेवेळी दिली. 
परब यांना ईडीने बुधवारी सकाळी ११ वाजता चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर परब दुपारी पावणे चारच्या दरम्यान ईडी कार्यालयात हजर झाले. आपल्या मालकीचे कोणतेही रिसॉर्ट नाही आणि हे मी यापूर्वीच तपास यंत्रणांना स्पष्ट केल्याची प्रतिक्रिया परब यांनी ईडी कार्यालयात जातेवेळी पत्रकारांना दिली. 
मंगळवारी झालेल्या दहा तासांच्या चौकशी दरम्यान परब यांनी काही कागदपत्रेदेखील तपास अधिकाऱ्यांना सादर केली. या प्रकरणी १५ जून रोजी देखील परब यांना ईडीने चौकशीसाठी तसेच जवाब नोंदविण्यासाठी समन्स जारी केले होते. मात्र, त्यावेळी ते शिर्डी येथे गेले होते.

काय आहे प्रकरण?
परब यांचे हे प्रकरण दापोली येथील साई रिसॉर्टशी संबंधित आहे. प्राप्तिकर विभागाने मार्च २०२२ मध्ये केलेल्या छापेमारी दरम्यान अनिल परब यांनी २०१७ मध्ये दापोली येथे एक कोटींना जमीन खरेदी केल्याचे पुढे आले. तसेच, या जमिनीची नोंदणी २०१९ मध्ये झाली व परब यांनी ही जमीन सन २०२० मध्ये सदानंद कदम यांना एक कोटी दहा लाखांना विकली. यावेळी या जागेवर रिसाॅर्ट होते. मात्र नोंदणीदरम्यान ही माहिती दिली नव्हती. तसेच या बांधकामावर मुद्रांक शुल्क भरले नसल्याची माहिती त्यावेळी पुढे आली होती. यानंतर या प्रकरणी २६ मे रोजी ईडीने अनिल परब आणि सदानंद कदम, संजय कदम या त्यांच्या निकटवर्तीयांशी संबंधित सात ठिकाणी छापेमारी केली होती. यावेळी परब यांच्या दोन्ही निवासस्थानी छापेमारी झाली होती. त्यानंतर ईडीने संजय कदम, सदानंद कदम यांची चौकशी केली. तसेच रत्नागिरी, खेड, दापोली येथील ग्रामपंचायतीसह शासकीय कार्यालयात अर्ज करून संबंधित कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. 

Web Title: ED officials will deliberately call for questioning every day, alleges Anil Parab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.