मुंबई - कोहिनूर मिल कर्ज प्रकरणातील अनियमिततेबाबत मनसे प्रमुख राज ठाकरे हे गुरुवारी सक्तवसुली संचालनालयाच्या चौकशीला सामोरे जात आहेत. या कारवाईमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मुंबईत चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कृष्णकुंज परिसर आणि दक्षिण मुंबईत ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आहे. तसेच ईडी कार्यालयाच्या परिसरात मनसेच्या कार्यकर्त्यांनी गर्दी करु नये, यासाठी मनसेच्या प्रमुख पदाधिकारी व मनसैनिकांना उपस्थित न राहण्यासाठी नोटीस बजाविल्या आहेत. या नोटिशीत कोणत्याही कृत्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाल्यास संबंधित व्यक्तीस जबाबदार धरून आपणाविरोधात कडक कारवाई करण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचे पूत्र व कोहिनूर समूहाचे संचालक उन्मेष जोशी तसेच त्यांचे तत्कालीन भागीदार राजन शिरोडकर यांच्या मागे लागलेला सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) चौकशीचा ससेमिरा अद्याप संपलेला नाही. बुधवारी त्यांची पुन्हा आठ तास कसून विचारणा करण्यात आली असून, सोमवारी (दि. २६) त्यांना पुन्हा चौकशीसाठी कार्यालयात बोलावण्यात आले आहे.कोहिनूर स्क्वेअर टॉवर प्रकल्पाच्या प्रारंभापासून करण्यात आलेला व्यवहार आणि त्यासंबंधीच्या दस्तऐवजांबाबत या दोघांकडून सविस्तर माहिती घेतली जात आहे. त्यासाठी जोशी व शिरोडकर यांना एकत्र तसेच स्वतंत्र बसून विचारणा करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
दादर (प.) शिवसेना भवनासमोरील कोहिनूर मिल-३ या जागेत उभारल्या जाणाऱ्या कोहिनूर स्क्वेअर टॉवरच्या २१०० कोटींच्या प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा ईडीला संशय आहे. इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अॅण्ड फायनान्शियल सर्व्हिसेसद्वारे (आयएलएफएस) कंपनीच्या थकीत कर्जाच्या अनुषंगाने मनसेप्रमुख व कोहिनूर समूहाचे तत्कालीन भागीदार राज ठाकरे यांच्यासह जोशी व शिरोडकर यांची चौकशी सुरू केली.
चौकशीसाठी सोमवारी पुन्हा बोलावले
सोमवारी व मंगळवारी जोशी यांची सलग आठ तास चौकशी करण्यात आली होती तर शिरोडकर यांची मंगळवारी पाच तास चौकशी करण्यात आली. दोघांना बुधवारीही कार्यालयात बोलाविल्याने ते ११च्या सुमारास हजर झाले. कोहिनूर टॉवरच्या व्यवहरासंबंधीची कागदपत्रे त्यांनी अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली. दोघांची एकत्र तसेच स्वतंत्रपणे विचारणा करण्यात आली.
सुमारे सातच्या सुमारास ते कार्यालयातून बाहेर पडले. त्यांच्याकडील चौकशी अपूर्ण राहिल्याने त्यांना सोमवारी सकाळी ११ वाजता पुन्हा बोलाविण्यात आले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. या प्रकरणी जोशी यांनी आतापर्यंत जवळपास ३६ तास तर शिरोडकर यांनी १३ तास ईडीच्या कार्यालयात हजेरी लावली आहे.