ED Raid : 'भावना गवळी उद्धव ठाकरेंच्या राईट हँड, 100 कोटींचा घोटाळा केला'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 02:43 PM2021-08-30T14:43:10+5:302021-08-30T14:44:15+5:30
ED Raid : वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांनी खासदारकीच्या २२ वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल १०० कोटींचा घोटाळा केला, असा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला होता.
मुंबई - शिवसेना खासदारभावना गवळी अडचणीत सापडल्या आहेत. यवतमाळ-वाशिमच्या खासदार असलेल्या गवळींच्या ५ संस्थांवर सक्तवसुली संचलनालयानं (ईडी) छापे टाकले आहेत. मुंबईहून वाशिमला पोहोचलेल्या ईडीच्या अधिकाऱ्यांनी गवळींच्या संस्थांवर धाडी टाकल्या. या प्रकरणी गवळींनी भाष्य करण्यास नकार दिला आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांची कारवाई पूर्ण झाल्यावर आपण बोलू, असं त्यांनी सांगितलं आहे. मात्र, भाजपा खासदार किरीट सोमैय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन भावना गवळींवर निशाणा साधला आहे.
वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांनी खासदारकीच्या २२ वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल १०० कोटींचा घोटाळा केला, असा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. आपल्याकडे सबळ पुरावे असून ईडी, सीबीआय, सहकार मंत्री, आयकर विभाग यांसह अन्य ठिकाणी तक्रारी करण्यात आल्याची माहिती २० ऑगस्ट रोजी वाशिम येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेते किरीट सोमय्या यांनी दिली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन सोमैय्या यांनी भावना गवळी ह्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या राईट हँड असल्याचं म्हटलं आहे. भावना गवळींच्या अनेक संस्थांवर ईडीने आज छापेमारी केली असून यापुढेही ही कारवाई होईल.
भावन गवळींनी आपल्या बालाजी आर्टीकल फोर्ट कारखान्यासाठी 44 कोटी रुपये भारत सरकारच्या बँकेचे कर्ज घेतले, 11 कोटी रुपये कर्ज स्टेट बँकांकडून घेतले. विशेष म्हणजे हा 55 कोटी रुपयांचा कारखाना आपल्याच बेनामी कंपनी असलेल्या भावना अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेडला केवळ 25 लाख रुपयांत विकला, असा गंभीर आरोप किरीट सोमैय्या यांनी केला आहे. त्यानंतर, नवीन बेनामी कंपनीवर आखणी 11 कोटी रुपयांचं कर्ज घेण्यात आलं. अशाप्रकारे भावना गवळींनी 100 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप किरीट सोमैय्या यांनी केला आहे.
मुंबईतील ईडीच्या अधिकाऱ्यांची धाड
मुंबई येथील ईडीचे अधिकारी रिसोड तालुक्यात धडकले. काहीजण देगाव येथील बालाजी पार्टिकलला पोहोचले. काही अधिकारी रिसोड शहरातील दि रिसोड अर्बन कॉ. ऑप. क्रेडीट सोसायटी लिमिटेड येथे दाखल झाले आहेत. त्यांनी शिक्षण संस्थांच्या अधिकाऱ्यांची चौकशी सुरू केली आहे.
ईडीला संपूर्ण सहकार्य, माध्यमांशी नंतर बोलणार- गवळी
या प्रकरणी खासदार भावना गवळींशी संपर्क साधला असताना त्यांनी भाष्य करण्यास नकार दिला. ईडीचे अधिकारी तपास करत असल्याच्या माहितीला त्यांनी दुजोरा दिला. ईडीच्या अधिकाऱ्यांना संपूर्ण सहकार्य करण्यात येत असून त्यांना आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता केली जात आहे. त्यांची कारवाई पूर्ण झाल्यावर आपण यावर भाष्य करू, असं गवळींनी सांगितलं.