भूषण स्टीलवर पाच ठिकाणी छापे; ३ मर्सिडीज जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 06:56 AM2023-10-18T06:56:33+5:302023-10-18T06:56:44+5:30
कर्जासाठी मिळालेल्या त्या पैशांतून मोठ्या प्रमाणावर व्यक्तिगत नावे मालमत्ता खरेदी केल्याचेही तपासात दिसून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : तब्बल ५६ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी भूषण स्टील या कंपनीवर व तिच्या पदाधिकाऱ्यांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मुंबई, दिल्ली, हरयाणा, कोलकाता, भुवनेश्वर येथील ३० ठिकाणी छापेमारी केली आहे. या छाप्यांदरम्यान, ५२ लाख रुपये मूल्याचे परदेशी चलन, ७२ लाख रुपये रोख, चार कोटी रुपये मूल्याच्या तीन अलिशान मर्सिडीज बेन्झ तसेच कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या लॅपटॉप व इलेक्ट्रॉनिक उपकरणांत असलेला डिजिटल पुरावा अधिकाऱ्यांनी जप्त केला आहे.
यापूर्वी, कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक नीरज सिंघल यांच्या मालकीचे रायगड, फरिदाबाद, हरयाणा येथील ६१ कोटी ३८ लाख रुपये मूल्याचे भूखंडदेखील जप्त केले होते. हजारो कोटी रुपयांची अफरातफर करीत ते हडप केल्याप्रकरणी भूषण स्टील या कंपनीविरोधात गंभीर गुन्हे अन्वेषण विभागाने (सिरियस फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन ऑफिस) गुन्हा दाखल केला आहे.
कर्जरकमेचा अपहार
भूषण स्टील कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक नीरज सिंघल यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशलन बँकेसह अनेक बँकांकडून हजारो कोटी रुपयांच्या कर्जाची उचल केली होती.
कर्ज प्राप्त रकमेचा दिलेल्या कारणांसाठी वापर करण्याऐवजी त्या पैशांचा अपहार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
या पैशांचा अपहार करण्यासाठी नीरज सिंघल यांनी त्यांच्या साथीदारांसोबत मिळून अनेक बनावट कंपन्यांची स्थापना केली होती. त्या कंपन्यांसोबत या कर्जप्राप्त रकमेचा व्यवहार झाल्याचे केवळ कागदोपत्री दाखवत कर्जापोटी मिळालेले पैसे व्यक्तिगत कामासाठी हडप केले होते.
व्यक्तिगत नावे मालमत्ता खरेदी
कर्जासाठी मिळालेल्या त्या पैशांतून मोठ्या प्रमाणावर व्यक्तिगत नावे मालमत्ता खरेदी केल्याचेही तपासात दिसून आले. त्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून, आता जप्तीची कारवाई सुरू झाली आहे. या प्रकरणी नीरज सिंघल यांना ९ जून रोजी अटक करण्यात आली असून, सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.