Join us

अनिल देशमुख यांच्या मुंबई, नागपुरातील घरात ईडीची झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 4:06 AM

महत्त्वपूर्ण दस्तावेज जप्त : स्वीय सहाय्यक संजीव पालांडेंना घेतले ताब्यातलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल ...

महत्त्वपूर्ण दस्तावेज जप्त : स्वीय सहाय्यक संजीव पालांडेंना घेतले ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कथित १०० कोटी वसुली प्रकरणी शुक्रवारी सकाळपासून अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यांच्या मुंबई आणि नागपुरातील निवासस्थानी झाडाझडती घेण्यास सुरुवात केली. यात, महत्त्वपूर्ण कागदपत्रे आणि दस्ताऐवज जप्त करण्यात आले आहेत. दुसरीकडे त्यांचे स्वीय सहाय्यक संजीव पालांडे यांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

ईडीने शुक्रवारी सकाळी ७ वाजता देशमुख यांच्या वरळीतील सुखदा इमारतीतील निवासस्थानी छापा टाकला. या कारवाईमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून वरळी पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला होता. ८ वाजता नागपूर येथील घरी छापा टाकण्यात आला. त्यानंतर सकाळी ९.२० च्या सुमारास राजीनामा दिल्यानंतरही देशमुख राहत असलेल्या ज्ञानेश्वरी बंगला या शासकीय निवासस्थानात ईडीचे पथक दाखल झाले. यावेळी देशमुख आणि त्यांची मुलगी बंगल्यात होते. ईडीच्या अधिकाऱ्यांनी घरातील कागदपत्रांची पाहणी केली. देशमुख यांच्याकडेही चौकशी केल्याचे समजते. साधारण तीन ते सव्वातीन तासांच्या तपासणीनंतर पथक बाहेर पडले. त्यानंतर देशमुख यांनी दुपारी साडेबाराच्या सुमारास सुखदा निवासस्थान गाठले. सकाळपासून त्यांच्या या घरात झाडाझडती सुरू हाेती.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या १०० कोटी रुपयांच्या कथित वसुली प्रकरणानंतर अनिल देशमुख यांनी राज्याच्या गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला हाेता, तर सीबीआयने देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. त्यापाठोपाठ ईडीनेही गुन्हा नोंदवत तपास सुरू केला. दरम्यान, मुंबईतील दहा बारमालकांनी देशमुख यांना तीन महिने चार कोटी रुपयांची राेख रक्कम दिल्याचे ईडीच्या तपासात समोर आले. ते पुरावे ईडीच्या हाती लागले असून, त्या आधारावर ही कारवाई सुरू असल्याचे ईडीच्या सूत्रांनी सांगितले. तसेच कोलकाता येथे काही बनावट कंपनीचे दस्तऐवज सीबीआयला सापडले होते. या बनावट कंपनीद्वारे कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाले आणि ते देशमुख यांच्याशी संबंधित असल्याचा संशय सीबीआयला आल्यानंतर ईडी सक्रिय झाली. याप्रकरणात ईडी वेगवेगळ्या कनेक्शनचा तपास करत असून, त्याच पार्श्वभूमीवर ही छापेमारी सुरू असल्याचे समजते.

दरम्यान, देशमुखांच्या बरोबरीने ईडीने त्यांचे खासगी सहाय्यक कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांच्या निवासस्थानीही छापे मारून शोध घेतला. त्यांचे खासगी स्वीय सहाय्यक संजीव पालांडे यांना ताब्यात घेत, त्यांची चौकशी सुरू केली आहे. परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपात पालांडे यांच्या नावाचाही अनेकदा उल्लेख करण्यात आला होता.

* घटनाक्रम

सकाळी

७ वाजता : ईडीचे पथक वरळीतील सुखदा निवासस्थानी दाखल

८ : नागपूर येथील घरी छापेमारी

९.२० वाजता : ईडीच्या पथकाकडून ज्ञानेश्वरी बंगल्यात छापा. यावेळी अनिल देशमुख त्यांची मुलगी बंगल्यात होते.

दुपारी

१२.२० : ईडीचे पथक ज्ञानेश्वरी बंगल्यातून बाहेर

१२.३० : अनिल देशमुख सुखदा निवासस्थानी दाखल

..................................................................