मुंबई : देशातील २४ बँकांकडून घेतलेल्या ४७६० कोटी रुपयांच्या कर्ज प्रकरणात बँकांची फसवणूक केल्याप्रकरणी जीटीएल लि. व जीटीएल इन्फ्रा या दोन कंपन्यांशी संबंधित मुंबईतील सहा ठिकाणी बुधवारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) छापेमारी केली.
उपलब्ध माहितीनुसार, आयडीबीआयप्रणीत २४ बँकांकडून कंपनीने ४७६० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. या कर्जापैकी बहुतांश रक्कम कर्ज ज्या कारणासाठी घेण्यात आले होते त्यासाठी न वापरता अन्य कारणासाठी वापरल्याचे तपासात दिसून आले होते. या प्रकरणी कर्जात अनियमितता दिसून आल्यानंतर कंपनीच्या आर्थिक व्यवहारांचे फोरेन्सिक ऑडिट झाले होते. यामध्ये कंपनीने आर्थिक गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. कंपनीला मिळालेल्या कर्जापैकी सुमारे ११४२ कोटी रुपये कंपनीने उत्पादनासाठी आवश्यक मालाच्या खरेदीसाठी वापरल्याचे सांगितले. मात्र, ज्या कंपन्यांकडून हा माल घ्यायचा होता त्या कंपन्यांना पैसे देऊनही त्या पैशांच्या मूल्याचा माल कंपनीने खरेदी केला नसल्याचे तपासात दिसून आले.
विशेष म्हणजे, ज्या कंपन्यांकडून कंपनीने मालाची उचल केली त्या कंपन्यादेखील जीटीएल कंपनीनेच तयार केल्या होत्या. त्यानंतर या कंपन्यांकडून हे पैसै पुन्हा जीटीएलकडे आल्याचे तपासणीत दिसून आले. मात्र, कंपनीने आर्थिक ताळेबंदामध्ये कंपनीला तोटा झाल्याचे दाखवले होते. ही रक्कम कंपनीच्या संचालकांनी हडप केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.