मुंबई : परकीय चलन व्यवस्थापन कायद्याचे (फेमा) उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुरुवारी मुंबईतील विख्यात हिरानंदानी समूहावर छापेमारी केली. कंपनीच्या मुख्यालयासह पवई, नरिमन पॉइंट, मलबार हिल, मुलुंड व पनवेल येथे ही छापेमारी झाली आहे.
कर सुलभ देशांत एका ट्रस्टमध्ये हिरानंदानी व कुटुंबाने गुंतवणूक केली असून, ते त्याचे प्रवर्तक आहेत. तिथे त्यांना आर्थिक फायदा झाल्याचा संशय ईडीच्या अधिकाऱ्यांना आहे. तसेच, तिथे मिळालेल्या आर्थिक लाभात परदेशी चलन व्यवस्थापन कायद्याचा भंग झाला आहे का, याची तपासणी करण्याकडे छापेमारीचा प्रामुख्याने कल असल्याचे समजते. मात्र, ‘फेमा’चे उल्लंघन कसे व कधी झाले याची माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिली नाही.
अलीकडेच लोकसभेत तृणमूल काँग्रेसच्या माजी खासदार महुआ मोइत्रा यांच्या ‘कॅश फॉर क्वेरी’ प्रकरणात निरंजन हिरानंदानी यांचे पुत्र दर्शन हिरानंदानी यांचे नाव चर्चेत आले. मात्र, गुरुवारी ईडीने केलेल्या छापेमारीचा या प्रकरणाशी संबंध नसल्याचे ईडीच्या सूत्रांनी स्पष्ट केले.