एचपीझेड ॲप कंपनीवर ईडीचे ११ ठिकाणी छापे; नवी मुंबई, ठाण्यासह देशात कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 09:43 IST2024-12-11T09:42:55+5:302024-12-11T09:43:07+5:30

एचपीझेड कंपनीने गुंतवणुकीसाठी स्वतःचे ॲप तयार केले होते व त्या माध्यमातून गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना अवास्तव व्याज देण्याची घोषणा केली.

ED raids HPZ app company at 11 locations; Action in the country including Navi Mumbai, Thane | एचपीझेड ॲप कंपनीवर ईडीचे ११ ठिकाणी छापे; नवी मुंबई, ठाण्यासह देशात कारवाई

एचपीझेड ॲप कंपनीवर ईडीचे ११ ठिकाणी छापे; नवी मुंबई, ठाण्यासह देशात कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ‘आमच्या कंपनीच्या योजनेत ५७ हजार रुपये गुंतवा, पुढच्या तीन महिन्यांसाठी तुम्हाला प्रत्येक दिवशी दिवसाला चार हजार रुपये व्याज देतो,’ असे सांगत देशाच्या अनेक राज्यांतील लाखो गुंतवणूकदारांना गंडा घालणाऱ्या एपीझेड ॲप कंपनीशी निगडित नवी मुंबई, ठाणे, दिल्ली, गुरगाव अशा ११ ठिकाणी ईडीने छापेमारी केली. या छाप्यांदरम्यान कंपनीच्या काही महत्त्वपूर्ण अधिकाऱ्यांची १२ कोटी ५० लाख रुपयांची मालमत्तादेखील ईडीने जप्त केली आहे. ईडीने आतापर्यंत कंपनीची ६१५ कोटी ९० लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

एचपीझेड कंपनीने गुंतवणुकीसाठी स्वतःचे ॲप तयार केले होते व त्या माध्यमातून गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना अवास्तव व्याज देण्याची घोषणा केली. यानुसार, ज्या गुंतवणूकदारांनी ५७ हजार रुपयांची गुंतवणूक केली, त्यांना तीन महिन्यांसाठी दररोज चार हजार रुपये व्याज देण्याची घोषणा केली. या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना पहिले काही दिवस हे पैसे देण्यातही आले. मात्र, कंपनीचे अन्य व्यवहार सुरू असल्याने जर गुंतवणूकदारांनी आणखी पैसे गुंतवले तर हा परवाता देणे शक्य असल्याचे कंपनीने जाहीर केले आणि त्यानंतर इंटरनेटवरून कंपनीच्या ॲपशी संपर्कही बंद झाला. या नंतर गुंतवणूकदारांनी अनेक राज्यांत पोलिसांत तक्रार दाखल केली होती. मात्र, या घोटाळ्याची व्याप्ती देशभर असल्यामुळे व मोठ्या प्रमाणावर क्लिष्ट आर्थिक व्यवहार झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर या प्रकरणाचा तपास ईडीकडे वर्ग करण्यात आला. 

ऑनलाइन गेमिंग, सट्टेबाजी ॲपद्वारेही केली कमाई 
या गुंतवणूक योजनेप्रमाणेच कंपनीने ऑनलाइन गेमिंग आणि सट्टेबाजी आपल्या ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देत त्याद्वारेदेखील मोठा पैसा कमावला आहे. त्या व्यवहारांचादेखील आता तपास होत आहे.

Web Title: ED raids HPZ app company at 11 locations; Action in the country including Navi Mumbai, Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.