मुंबई - मुंबईतील एका खासगी कंपनीला ५० कोटी रुपयांच्या कर्जाचे वितरण करत त्या बदल्यात त्यांच्याकडून तीन कोटी रुपये लाचेपोटी स्वीकारणाऱ्या ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग या सरकारी कंपनीच्या माजी अध्यक्षाला, सरव्यवस्थापकाला ‘सीबीआय’ने अटक केल्यानंतर आता या प्रकरणाचा तपास ‘ईडी’नेही सुरू केला आहे.
बुधवारी ‘ईडी’ने याप्रकरणी मुंबई व फरिदाबाद येथे छापेमारी केली आहे. १९ एप्रिल रोजी ‘सीबीआय’ने या कंपनीच्या माजी अध्यक्षाला व सरव्यवस्थापकाला अटक केली होती. अटक करण्यात आलेल्या कंपनीच्या माजी अध्यक्षाचे नाव जॉर्ज कुरुविला आणि सरव्यवस्थापकाचे नाव डब्ल्यू. बी. प्रसाद असे आहे. या दोघांनी २०२२ यावर्षी कंपनीला कर्ज वितरण करण्यासाठी लोकांच्या माध्यमातून संगनमत केले, तसेच अधिक कर्ज मिळवण्यासाठी कागदपत्रांत फेरफार केल्याचा ठपका ‘सीबीआय’ने त्यांच्यावर ठेवला. ५० कोटींच्या कर्जाच्या मोबदल्यात ३ कोटींची लाच स्वीकारल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ‘सीबीआय’ने या दोघा अधिकाऱ्यांना अटक केली होती.