मुंबई - जेट एअरवेजचे मालक नरेश गोयल यांच्या दिल्ली आणि मुंबई येथील घरावर ईडीने छापे टाकले आहेत. जेट एअरवेज प्रायव्हेट लिमिटेडमध्ये एतिहाद एअरवेजकडून करण्यात येणाऱ्या गुंतवणुकीची ईडी चौकशी करत आहे.
तपास यंत्रणेचं म्हणणं आहे की, 2014 मध्ये जेट एअरवेजमध्ये झालेल्या गुंतवणुकीत परदेशी गुंतवणूक कायद्याचं उल्लंघन केलं आहे. जेट एअरवेजवर 8500 कोटीपेक्षा अधिक कर्ज आहे. यात कर्मचाऱ्यांचा पगार जोडला तर ही रक्कम 11 हजार कोटींपर्यंत जाते. यापूर्वीही जेट एअरवेजचे संस्थापक नरेल गोयल यांना गुरूवारी तपास यंत्रणांनी फसवणुकीच्या प्रकरणाखाली चौकशी केली. जेट एअरवेजमधील 18 हजार कोटींच्या कथित आर्थिक व्यवहारामधील अनियमितता यावर गोयल यांना प्रश्न विचारण्यात आले.
याआधी जेटमध्ये २४ टक्के भागीदारी असलेल्या एतिहादच्या प्रवक्त्यांनी सांगितले होते की, भारताच्या जेट एअरवेजमध्ये काही अटींवर पुन्हा गुंतवणूक करण्याचा विचार सुरू आहे. परिवहन क्षेत्रात भारत जगात वेगाने वाढत आहे. यूएईचा आर्थिक सहकारी देश म्हणूनही भारताकडे पाहिले जाते. आम्ही एअरवेजचे मुख्य गुंतवणूकदार बनू इच्छित नाहीत. याशिवायही गुंतवणूकदारांना पुढे यावे लागेल. यात फेरभांडवलीकरण व्हायला हवे. एतिहादशिवाय नॅशनल इन्व्हेस्टमेंट अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर फंड (एनआयआयएफ), टीपीजी कॅपिटल आणि इंडिगो यांनाही गुंतवणुकीबाबत अपेक्षा आहेत.