चौगुले समूहावर ईडीची छापेमारी; १९ हजार कोटी पाठवले परदेशी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2024 06:52 AM2024-07-07T06:52:32+5:302024-07-07T06:52:54+5:30
अवैधरीत्या परकीय चलनाचा वापर केल्यामुळे ईडीची मुंबई व गोवा येथे छापेमारी
मुंबई : तब्बल २२८ मिलियन अमेरिकी डॉलर (भारतीय चलनात अंदाजे १९ हजार कोटी) अवैधरीत्या परदेशात पाठविल्याचा आरोप असलेल्या गोव्यातील चौगुले समूहाशी निगडित १० ठिकाणी ईडीने मुंबई व गोवा येथे छापेमारी केली. छापेमारीदरम्यान काही संशयास्पद व्यवहारांची कागदपत्रे तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तू अधिकाऱ्यांनी जप्त केल्या आहेत. चौगुले कंपनी प्रा. लि., चौगुले, स्टीमशिप लि., पी. पी. महात्मे ॲण्ड कंपनी, चौगुले कुटुंबातील सात जणांची निवासस्थाने, त्यांच्या समूहाचे चार्टर्ड अकाउंटंट प्रदीम महात्मे, कंपनीचे माजी व्यवस्थापकीय संचालक मंगेश सावंत यांच्याकडे ही छापेमारी झाली आहे. परकीय चलन नियमन कायद्याअंतर्गत (फेमा) ही छापेमारी झाली आहे. चौगुले समूहाने परदेशात काही कंपन्यांची स्थापना करीत भारतीय कंपन्यांतून तेथे मोठ्या प्रमाणावर पैसे पाठविले असल्याची माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या प्रकरणी तपास केला असता १९ हजार कोटींची रक्कम कंपनीने अवैधरीत्या परदेशात पाठविल्याची माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती.