Join us

गुंतवणूकदारांना गंडा घालणाऱ्यांवर छापे; मलायका क्रेडिट सोसायटीची ६० कोटींची मालमत्ता जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2023 8:26 AM

याप्रकरणी एकूण ४४ मालमत्तांची जप्ती झाली.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : भरघोस परताव्याचे आमिष दाखवत सामान्य गुंतवणूकदारांकडून २०० कोटी रुपये जमा करत ते लंपास करणाऱ्या मीरा रोड येथील मलायका मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीची ६० कोटी ४४ लाख रुपयांची मालमत्ता ईडीने (सक्तवसुली संचालनालय) शुक्रवारी जप्त केली. याप्रकरणी एकूण ४४ मालमत्तांची जप्ती झाली असून यामध्ये आलिशान इमारतींमधील काही सदनिका, दुकानांचे गाळे, भूखंड आदींचा समावेश आहे. याप्रकरणी या संस्थेचा अध्यक्ष असलेल्या गीलबर्ट बॅप्टिस्ट याला यापूर्वीच ईडीने अटक केली असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मीरा रोड येथे मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीची स्थापना केल्यानंतर गीलबर्ट याने त्यामध्ये अनेक संचालकांची नेमणूक केली. मात्र, ते संचालक केवळ नावापुरते होते. त्यांच्यामार्फत गुंतवणुकीच्या अनेक योजना गीलबर्ट याने सादर केल्या. ज्यावर भरघोस परताव्याचे आमिष देण्यात आले होते. या पद्धतीने त्याने २०० कोटी रुपये जमा केले. जमा झालेले हे पैसे त्याने मलायका ॲपलायन्सेस, यशोमा इंडस्ट्रीज, यशोमा वेडिंग सारी, मलायका स्टारसिटी प्रोजेक्ट या त्याच्याच मालकीच्या अन्य कंपन्यांमध्ये वळवले. संस्थेचे ज्यावेळी लेखापरीक्षण झाले. त्यावेळी संस्थेच्या आर्थिक व्यवहारात अनियमितता असल्याच्या मुद्यावर लेखा परीक्षकांनी बोट ठेवले होते. मात्र, गीलबर्ट याने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे. 

तसेच, ज्या अन्य कंपन्यांत त्याने पैसे वळविले होते त्यांच्या आर्थिक व्यवहारांतदेखील अनियमितता असल्याचे तपासात आढळून आले. तेथून त्याने हे पैसे स्वतःच्या व स्वतःच्या कुटुंबीयांच्या नावे फिरविल्याचे तपासात दिसून आले. तसेच, कर्नाटक येथेही त्याने काही अचल मालमत्तांची खरेदी केल्याचे आढळून आले. यानंतर मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे खाते थकीत खाते म्हणून घोषित करण्यात आले. यामुळे हजारो सामान्य गुंतवणूकदारांचे पैसे मोठ्या प्रमाणात बुडाले. याप्रकरणी सर्वप्रथम मीरा रोड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.  मात्र, या प्रकरणामध्ये मनी लाँड्रिंग झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर हे प्रकरण ईडीकडे वर्ग करण्यात आले. गीलबर्ट याने सामान्य गुंतवणूकदारांचा मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये गुंतलेला पैसा हडप केल्याचे ईडीच्या तपासात दिसून आले आहे.

 

टॅग्स :धोकेबाजी