लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : बँकेकडून एका प्रकल्पासाठी कर्ज घेत त्या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी श्री शिव पार्वती साखर कारखाना व त्यांच्याशी संबंधित मुंबई, पुणे, कर्जत, बारामती येथील वास्तुंमध्ये ईडीने छापेमारी केली आहे. या कारवाईदरम्यान काही संशयास्पद व्यवहारांची कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे तसेच साडेएकोणीस लाख रुपयांची रोख रक्कम ईडीच्या अधिकाऱ्यांनी जप्त केली आहे. कारवाई झालेल्या ठिकाणांमध्ये कारखान्याचे संचालक नंदकुमार तासगावकर, संजय आवटे आणि राजेंद्र इंगवले यांच्याशी निगडित ठिकाणांचाही समावेश आहे.
श्री शिव पार्वती साखर कारखान्याने बँकेकडून एका प्रकल्पासाठी १०० कोटी रुपयांच्या कर्जाची उचल केली होती. या प्रकल्पामध्ये बँकेच्या १०० कोटी रुपयांसोबतच कारखान्यातर्फे ७१ कोटी १९ लाख रुपये गुंतवले जाणार होते. मात्र, कारखान्याने या प्रकल्पात स्वतःची गुंतवणूक केली नसल्याचे ईडीच्या तपासात स्पष्ट झाले.
तसेच कर्जाची रक्कम संचालकांनी आपल्या समूहातील अन्य कंपन्यांकडे वळवून त्याचा वैयक्तिक लाभ घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. यामुळे बँकेच्या कर्जाची परतफेड न झाल्यामुळे बँकेला तोटा झाला होता. या प्रकरणी सर्वप्रथम दिल्लीत सीबीआयने गुन्हा नोंदवला होता. मात्र, हे मनी लॉँड्रिंगचे प्रकरण असल्याचे निष्पन्न झाल्यावर ईडीने त्या दिशेने तपास सुरू केला.