कार्यालयाबाहेर बंदोबस्तात वाढ
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची अनुक्रमे मंगळवार व बुधवारी चौकशी केली जाणार आहे. त्याबाबत अधिकाऱ्यांनी सर्व तयारी केली असून, सुरक्षेच्या दृष्टीने ईडीच्या दक्षिण मुंबईतील बेलार्ड पियार्डमधील कार्यालयाच्या परिसरात बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
वर्षा राऊत या मंगळवारी होणाऱ्या चौकशीला हजर राहणार की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, त्याबाबतची सर्व खबरदारी घेण्यात आली असल्याचे सूत्राकडून सांगण्यात आले.
वर्षा राऊत यांच्या पीएमसी बँकेतील खात्यावर १२ वर्षांपूर्वी एका निकटवर्तीयाकडून ५० लाख रुपये जमा करण्यात आले होते. त्या व्यवहाराबाबत माहिती जाणून घेण्यासाठी गेल्या दीड महिन्यांपासून ईडीकडून विचारणा करण्यात येत आहे. त्याबाबत त्यांना २९ डिसेंबरला कार्यालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहेत. त्याबाबत सोमवारी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपकडून ईडीचा राजकीय वापर होत असल्याची जोरदार टीका केली. मात्र, त्यांची पत्नी वर्षा मंगळवारी ईडीच्या कार्यालयात जाणार की नाही, हे स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे त्या गैरहजर राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्यासाठी प्रश्नावली तयार ठेवली आहे.
दुसरीकडे मंगळवारी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना पुण्यातील भोसरी येथील भूखंडाच्या खरेदीबाबत चौकशीसाठी बाेलावले आहे. त्यासाठीची सर्व तयारी ईडीने पूर्ण केल्याचे सूत्रांनी सांगितले.
दोन्ही दिवशी त्यांचे समर्थक व पक्षाचे कार्यकर्ते ईडीच्या परिसरात गर्दी करण्याची शक्यता आहे, त्यामुळे या ठिकाणी बंदोबस्त वाढविला आहे.
.....................................