‘जेट’चे गोयल यांना ११पर्यंत ईडी कोठडी; कॅनरा बँक कर्ज घोटाळा प्रकरण, ५३८ कोटी थकविले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2023 06:23 AM2023-09-03T06:23:48+5:302023-09-03T06:24:20+5:30
शुक्रवारी गोयल यांची दिवसभर चौकशी करण्यात आली.
मुंबई : कॅनरा बँकेची ५३८ कोटींना फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना शनिवारी सत्र न्यायालयात सादर करण्यात आले. सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टाने गोयल यांना ११ सप्टेंबरपर्यंत ईडी कोठडीची शिक्षा सुनावली.
कॅनरा बँकेने जेट एअरवेजला ७२८ कोटी रुपयांच्या कर्जापैकी ५३८ कोटी ६२ लाख कर्ज कंपनीने थकवल्याप्रकरणी बँकेने सीबीआयकडे लेखी तक्रार केली. त्या तक्रारीच्या आधारे सीबीआयने गुन्हा दाखल केला. सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे ईडीने गोयल यांच्या विरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर ईडीने नरेश गोयल यांच्या कार्यालय आणि घरावर छापे मारले.
शुक्रवारी गोयल यांची दिवसभर चौकशी करण्यात आली. रात्री उशिरा ईडीने त्यांना अटक केली हाेती. शनिवारी सकाळी त्यांना विशेष पीएमएलए न्यायालयात न्यायाधीश एस. बी. जोशी यांच्या समोर हजर करण्यात आले तेव्हा, ईडीच्या वतीने ॲड. सुनील गोन्साल्विस यांनी बाजू मांडत गोयल यांच्या अधिकच्या चौकशीसाठी १४ दिवसांची कोठडी मागितली. मात्र, न्यायालयाने त्यास नकार देत गोयल यांना ११ सप्टेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली.
बायपास आणि पाठ, मणक्याचा त्रास
नरेश गोयल यांच्या वतीने ज्येष्ठ वकील आबाद पोंडा यांनी न्यायालयाला माहिती देताना सांगितले की, गोयल यांची बायपास व नी रिप्लेसमेंट सर्जरीही झाली आहे. तसेच त्यांना पाठीचा व मणक्याचाही त्रास आहे त्यामुळे गोयल यांना घरचे जेवण, वकिलांना भेटायची व औषध घेण्याची परवानगी मिळावी. या मागण्या मंजूर करत सुनावणी तहकूब केली.