ईडीने नोंदवला सुशांतच्या सीएचा जबाब, फॉरेन्सिक ऑडिटरची नेमणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2020 05:56 AM2020-08-05T05:56:20+5:302020-08-05T05:57:28+5:30
मुंबई पोलिसांकड़ून फॉरेन्सिक ऑडिटरची नेमणूक
मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सीए संदीप श्रीधर यांच्याकड़ून सुशांतच्या खात्याबाबत चौकशी करत, त्यांचा जबाब नोंदवला. तसेच अन्य काही जणांना चौकशीसाठी समन्स बजाविण्यात येतील, असे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणावरून होत असलेल्या आरोप-प्रत्यारोपामुळे राज्यातील राजकारणही चांगलेच तापले आहे.
बिहार पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारावर ईडीने सुशांत प्रकरणात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा नोंद करत तपास सुरू केला. सुशांतच्या वडिलांनी त्याच्या खात्यातून १५ कोटी ट्रान्सफर झाल्याचा आरोप केला आहे. सुशांतच्या खात्याची माहिती घेण्यासाठी मंगळवारी सुशांतचे सीए संदीप श्रीधर यांना बोलाविले होते. त्यांच्याकडून सुशांतच्या खात्याची चौकशी करत, संबंधित कागदपत्रे, बँक स्टेटमेंट ईडीकडून ताब्यात घेण्यात आले. तसेच जबाबही नोंदविला.दुसरीकडे मुंबई पोलिसांनीही सुशांतच्या बँक व्यवहाराच्या चौकशीसाठी फॉरेन्सिक आॅडिटरची नेमणूक केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. श्रीधर यांचा जबाब मुंबई पोलिसांनी यापूर्वीच नोंदवला आहे. त्यात त्यांनी सुशांतच्या खात्यात तेवढे पैसे नसल्याचे म्हटले होते.